बीड जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

चार मध्यम प्रकल्पांसह 18 लघुप्रकल्प भरले तुडुंब

चार मध्यम प्रकल्पांसह 18 लघुप्रकल्प भरले तुडुंब
बीड - जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे चार मध्यम प्रकल्पांसह 18 लघुप्रकल्प असे एकूण 22 प्रकल्प तुडुंब भरले असून, या प्रकल्पांच्या सांडव्यांवरून पाणी वाहू लागले आहे. जवळपास 25 प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याच्या वर सरकला आहे. याशिवाय माजलगाव व मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पांमध्येही बऱ्यापैकी पाण्याची आवक सुरू झाली असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यात जुलैमध्ये सुरवातीच्या पावसानंतर तब्बल दोन महिने दडी मारलेल्या पावसाचे शनिवारी (ता. 19) दुपारनंतर पुन्हा आगमन झाले. शनिवारी (ता. 19) व रविवारी (ता. 20) सलग दोन दिवस दमदार पाऊस झाला. या दोन दिवसांत जिल्ह्यातील 42 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यानंतरही गेल्या आठ दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. रविवारी (ता. 27) सरासरी 21.10 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आज घेण्यात आली आहे. यामध्ये मांजरसुंबा, नेकनूर, थेरला, अंमळनेर, धामणगाव या पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील महासांगवी, कांबळी, बिंदुसरा, अपर कुंडलिका या चार मध्यम प्रकल्पांसह 18 लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 666 मिलिमीटर आहे. सोमवारी (ता. 28) सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 66.12 टक्के पाऊस झाला असून, 1 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीतील वार्षिक सरासरीच्या 106.30 टक्के पाऊस आहे. विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारपर्यंत (ता. 18) जिल्ह्यात केवळ 38 टक्के इतका पाऊस झाला होता. मात्र, पावसाचे पुनरागमन झाल्यावर अवघ्या दहा दिवसांत ही टक्केवारी 66 टक्‍क्‍यांवर गेली असून, दहा दिवसांत 28 टक्के पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे.

हे प्रकल्प भरले तुडुंब
जिल्ह्यात दोन मोठे, 16 मध्यम व 126 लघू असे एकूण 144 प्रकल्प आहेत. यापैकी महासांगवी, कांबळी, बिंदुसरा व अपर कुंडलिका असे चार मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. याशिवाय भायाळा, कटवट, सुलेमान देवळा, मुंगेवाडी, शिवणी, पांढरी साठवण तलाव, पांढरी लघुपाटबंधारे तलाव, खटकाळी, मोरझलवाडी, धामणगाव, भंडारवाडी, डोकेवाडा, करचुंडी, ब्रह्मगाव, इंचरणा, लांबरवाडी, वडगाव व चारदरी आदी 18 लघुप्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

Web Title: beed marathwada news rain