महसूल करवसुलीत बीड जिल्हा मराठवाड्यात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बीड - वर्ष २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महसूल करापोटी ५९ कोटी ३९ लक्ष ५० हजार रुपयांचे वसुली उद्दिष्ट मिळाले होते. वर्षाअखेर जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षाही जास्तीची म्हणजेच तब्बल ८१ कोटी २१ लक्ष ३० हजार रुपयांची कर वसुली केली असून याचे प्रमाण सुमारे १३६ टक्के आहे. महसूल कर वसुलीमध्ये बीड जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून वर्ष २०१७-१८ या वर्षासाठी महसूल करवसुलीचे ५९.३९ कोटी रुपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने कर वसुलीचे योग्य नियोजन करीत वेळोवेळी वसुलीचा आढावा घेतल्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती झालीच, शिवाय उद्दिष्टापेक्षाही भरीव वसुली प्रशासनाने केली आहे. मार्चअखेरपर्यंत तब्बल ८१.२१ कोटी इतकी वसुली करण्यात आली असून उद्दिष्टाच्या १३६ टक्के वसुली झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत सातत्याने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली केली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झालेले नसतानाही ही उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाने यश मिळविले आहे. 

वर्ष २०१५- १६ मध्ये जिल्ह्याला ६३.२० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट मिळाले होते. त्या वेळी प्रशासनाने ६४.५९ कोटींची म्हणजेच १०२ टक्के करवसुली केली. त्यानंतर वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्ह्याला ६४.०९ कोटींचे उद्दिष्ट मिळाले. त्या तुलनेत त्या वेळी प्रशासनाने ८२.९२ कोटींची म्हणजेच १२९ टक्के इतकी वसुली केली. चालू वर्षी तर तब्बल १३६ टक्के वसुली करण्यात आली आहे. यामध्ये जमीन महसूल करापोटी ८.८६ कोटी, तर गौण खनिज करापोटी ७२.३५ कोटी इतकी वसुली करण्यात आली आहे.

विभागाची उद्दिष्टपूर्तीही जिल्हा प्रशासनामुळे साध्य
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी करवसुलीचा वारंवार आढावा घेऊन उद्दिष्टपूर्तीचे नियोजन केल्याने उद्दिष्टपूर्ती तर झालीच, शिवाय औरंगाबाद विभागाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी १३ कोटी रुपये कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यावर विभागाची उद्दिष्टपूर्ती व्हावी म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करून वसुली वाढवून ही तफावत दूर करीत विभागाचीही उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

Web Title: beed marathwada news revenue tax recovery