कोणाचेही घर फुटू देण्याची भावना नाही - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

बीड - भांड्याला भांडं लागतं; पण आवाज किती मोठा होऊ द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. कोणाचे घर फुटावे ही पक्षाची भावना कालही नव्हती, आजही नाही व उद्याही राहणार नाही, असे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १७) कार्यकर्ता मेळाव्यात दिले. 

बीड - भांड्याला भांडं लागतं; पण आवाज किती मोठा होऊ द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. कोणाचे घर फुटावे ही पक्षाची भावना कालही नव्हती, आजही नाही व उद्याही राहणार नाही, असे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १७) कार्यकर्ता मेळाव्यात दिले. 

श्री. पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांना पक्षात येण्याच्या दीड वर्षापूर्वी दिवंगत पंडितअण्णा मुंडे शरद पवारांना भेटले होते; पण तिथेच जमवून घ्या, असा सल्ला त्यांना दिला होता; मात्र काहीच जुळेना म्हणून शेवटी त्यांनी प्रवेश केला. आपण, प्रथम खासदार झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यासोबत काम केलेले आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

यावेळी सुनील तटकरे म्हणाले, सत्ता गेली तरी जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत कायम आहे. धनंजय मुंडे म्हणाले, नेत्यांचे प्रथमच एवढ्या उत्साहात स्वागत झाले आहे. जिल्हा परिषदेतील प्रकार व्हायला नको होता. मात्र, होते ते चांगल्यासाठीच असेही ते म्हणाले. आगामी विधानसभेला परळीसह जिल्ह्यातील सहाही जागा जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी माजी आमदार राजेंद्र जगताप, उषा दराडे, रेखा फड, गंगाधर घुमरे, अमर नाईकवाडे विजय पंडित, अशोक डक, रवींद्र क्षीरसागर, हेमा पिंपळे आदी उपस्थित होते.

या वेळी चित्रा वाघ यांनी ॲड. हेमा पिंपळे यांच्या जागी रेखा फड यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. तर पिंपळे यांची राज्य सचिवपदी निवड जाहीर केली. शिवसंग्रामचे सुनील नाथ, शिवसेनेचे भाऊसाहेब डावकर व विजय खंडागळे, दिलीप भोसले, मनसेचे दादासाहेब गव्हाणे यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गद्दारी त्यांच्या रक्तातच
जिल्हा परिषदेला काही लोकांनी विश्‍वासघात केला, पक्षाने ज्यांना सर्व काही दिले त्यांनीच विश्‍वासघात केला, असा टोला अजित पवारांनी नाव न घेता सुरेश धस यांना लगावला. ‘गद्दारी’ त्यांच्या रक्तातच असून सत्तेशवाय जमत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. धनंजय मुंडे यांनीही नाव न घेता धस यांचा असाच उल्लेख केला.

मतदार संघनिहाय आढावा
सकाळी अजित पवार व सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांचा आढावा घेतला. जिल्ह्यात संघटन वाढवा, गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता झाला पाहिजे, केवळ लेटरपॅड  छापण्यासाठी पदे नकोत, पुढच्या तीन महिन्यांनी आढावा घेताना काम दिसले पाहिजे असेही श्री. पवार म्हणाले. आढावा बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन संवाद साधला. आष्टी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देऊ, वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार म्हणाले. बीडच्या आढाव्यात कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला; पण आरोप-प्रत्यारोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करू नका, असा सल्ला पवारांनी दिला. परळीच्या आढाव्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले. 

दोघांनीही ठेवले एकमेकांना अधांतरी
दरम्यान, मेळाव्याच्या नियोजनात संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या काकू-नाना आघाडीचे कार्यकर्ते आघाडीवर होते; पण आघाडीचे राष्ट्रवादीत विलीनीकरण केले नाही. तर, बैठकीमध्ये आगामी विधानसभेची उमेदवारी त्यांना द्यावी, अशी मागणीही समर्थकांनी केली. त्यावर अजित पवारांनी ‘तव्यावर एकाच ठिकाणी भाकरी ठेवली तर करपते’ त्यामुळे फिरवण्याची वेळ आली असे वक्तव्य करून काही काळ कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आणला; पण मेळाव्यातील भाषणात कोणाचे घर फोडण्याची इच्छा नाही, भांड्याला भांडे लागले तरी आवाज किती येऊ द्यायचा, असे विधान करून पुन्हा अधांतरी ठेवले.

Web Title: beed marathwada news There is no feeling of breaking a house