मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड - शेतातील घटलेले उत्पन्न आणि उसने घेतलेले पैसे कसे फेडावेत, या नैराश्‍यातून युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुडेगाव (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (ता. २२) रात्री घडली. अंगद अमृत जगताप (वय ३४) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अंगद यांनी पेरणी व इतर कामांसाठी हातउसने पैसे घेतले होते. कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंगदच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

शेतकऱ्याने घेतले कीटकनाशक 
परभणी - तालुक्‍यातील पिंगळी येथील शेतकरी शिवराम रघुनाथ भुजबळ (वय ६१) यांनी रविवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. भुजबळ यांच्याकडे तीन एकर शेती होती. यंदा उसनवारी करून त्यांनी पेरणी केली होती. मात्र, दुबार पेरणीचे संकट ओढवले. पुन्हा बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नव्हते. पैशांची सोय लागत नसल्याने त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी दुपारी दीड वाजता त्यांचा मृत्यू 
झाला.

कोळीबोडखा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
पाचोड - अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने, तसेच मुलीचे लग्न कसे करावे, या धास्तीने शेतकऱ्याने घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २३) कोळी-बोडखा (ता. पैठण) येथे घडली.

शेतकरी लहू कचरू मगरे (वय ४५) यांना कोळी-बोडखा शिवारात जेमतेम शेती असून शेतीसह मोलमजुरी करून ते कुटुंबीयाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना चार मुली व एक मुलगा असून, तीन मुलीचे लग्न झालेले आहे. सततच्या दुष्काळाने शेती तोट्याची ठरली. त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे ते नेहमी तणावात राहू लागले. यातूनच रविवारी (ता. २३) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांना त्यांना तत्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ ए. आर. कदम यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com