१० हजारांत गर्भपात करणाऱ्या ‘वैद्यकीय’ विद्यार्थ्याचा शोध सुरूच

चार महिन्यांपासून मनीषा सानपच्या घरी सुरू होता प्रकार
Abortions crime from four months
Abortions crime from four monthsSakal

बीड : गर्भलिंगनिदान व गर्भपातानंतर सीताबाई गाडे हीच्या मृत्यू प्रकरणाच्या मुळाशी आणि यापूर्वी असे प्रकार घडले असतील तर त्या साखळीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. तपासात कुठलाही दबाव घेतला जाणार नाही, असे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्पष्ट केले.

सीताबाई ऊर्फ शीतल गाडे हीचे गर्भलिंगनिदान करणारा सतीश बाळू सोनवणे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर येथून अटक केल्याची माहिती श्री. ठाकूर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, विभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ उपस्थित होते.

श्री. ठाकूर म्हणाले, सतीश सोनवणेचा मोबाईल बंद असल्याने त्याचे लोकेशन काढणे अवघड होते. तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत त्याचा नगर येथे छडा लागला. त्याच्या शोधासाठी पुणे, औरंगाबाद, जालन्यासह जिल्ह्यातही पोलिस पथके प्रयत्न करत होती. जालना येथे अशाच प्रकारची डॉ. गवारेचे प्रकरण असून, हा सतीश सोनवणे त्याचा सहायक म्हणून काम करायचा. तो एमबीबीएसचा विद्यार्थी असून नापास झाल्यानंतर तीन वर्षांनी आता शेवटच्या वर्षांची परीक्षा देत असल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याचेही नंदकुमार ठाकूर म्हणाले.

दरम्यान, गेल्या रविवारी तालुक्यातील बकरवाडी येथील सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे या महिलेचा गर्भपात करताना गर्भपिशवीला इजा झाल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी गर्भलिंगनिदान व बेकायदा गर्भपात प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फौजदार महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद आहे. यापूर्वी या प्रकरणात बडतर्फ अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी सानप, पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके यांना अटक झालेली आहे. तर, आरोपी सीमा सुरेश डोंगरे हिने आत्महत्या केलेली आहे.

मुळाशी जाणार; मनीषाचा पीसीआर मागणार : ठाकूर

या प्रकरणात गर्भलिंगनिदानात एजंट असलेल्या मनिषा शिवाजी सानप हिचा पोलिसांनी एमसीआर मागितल्याने तपासाबद्दल संशय व्यक्त केला जात होता. यावरही नंदकुमार ठाकूर यांनी खुलासा केला. पीसीआरमध्ये तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याने ती तपासात मदत करत नव्हती. त्यामुळे तीच्या पीसीआरचा हक्क अबाधित राहावा, म्हणून तीला एमसीआर मागितला होता. आता पुन्हा तिला पीसीआर मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संशयित आरोपी सतीश सोनवणे याने चार महिन्यांपासून मनिषा सानपच्या घरी येऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान करत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी तो तिच्याकडून दहा हजार रुपये घ्यायचा. मनिषा सानप त्याने येण्याची तारीख निश्चित करत असे. यात सीताबाई गाडे हिच्यासह अन्य कोणाचे गर्भलिंगनिदान व गर्भपात झाले, याच्याही मुळाशी जाणार असल्याचे नंदकुमार ठाकूर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com