एकाचा अनुभव, तर दुसऱ्याची महत्त्वाकांक्षा पणाला

municipal-corporation
municipal-corporation

बीड - येथील नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे; मात्र चर्चेत अडकलेली शिवसेना-भाजप युती, शिवसंग्रामची निवडणुकपूर्वीच झालेली ‘आउटगोईंग’, एमआयएम, रिपाइं आणि काँग्रेस लढवत असलेल्या कमी जागा यामुळे हे सर्व पक्ष आजघडीला ‘बॅकफूट’वर आहेत. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांच्यातच आहे.

पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी, शिवसेना, भाजप, एमआयएम, रिपाइं आणि काकू-नाना विकास आघाडी असे सर्वच पक्ष सरसावले आहेत; मात्र काकू-नाना विकास आघाडी वगळता एकाही पक्षाला सर्व ५० जागांवर उमेदवार देणे जमलेले नाही. शिवसेना व भाजपने स्वतंत्ररीत्या उमेदवारी दाखल केली. मात्र, माघार घेण्याची तारीख जवळ आलेली असतानाही त्यांच्या युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही संपलेले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत केवळ तीन जागा मिळविल्या. त्यातही एका जागेवरील त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. चर्चेत असलेल्या एमआयएमकडून केवळ २० जागा लढविल्या जात आहेत. रिपाइंनेदेखील दहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ५० पैकी तीन जागा काँग्रेसला देत ४७ ठिकाणी उमेदवार उभे केले; मात्र एबी फॉर्म अन्‌ फॉर्मवरील स्वाक्षरी, तसेच सूचकांचा अभाव यामुळे डॉ. योगेश क्षीरसागर, मोईन मास्टर, मीना रणजितसिंग चौहान, भीमराव मरिबा वाघचौरे आणि काँग्रेसच्या सुनीता अशोक हिंगे आघाडीच्या अशा पाच जणांचे अर्ज बाद ठरले. परिणामी, आघाडीचे ५० पैकी ४५ जागांवरच उमेदवार रिंगणात आहेत. 

यातील मीना चौहान व भीमराव वाघचौरे यांचा पक्षाचा अर्ज बाद ठरला असला तरी त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरल्याने राष्ट्रवादीला त्या ठिकाणी त्यांना अपक्ष म्हणून पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक पाचमधून पक्षाचे डॉ. योगेश क्षीरसागर व मीरा चौहान या दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तेथे अधिकृत उमेदवार नसल्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली आहे. त्यातही डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांचाच अर्ज बाद झाल्याने व त्यांचा अपक्ष अर्जही सूचकांअभावी बाद ठरल्याचे शल्य त्यांना जास्त बोचत आहे.  

सख्खे भाऊच एकमेकांचे विरोधक

नगराध्यक्षपदासाठी काकू-नाना विकास आघाडीकडून रवींद्र क्षीरसागर यांना प्रमोट करण्यात आले आहे. ते डॉ. भारतभूषण यांचे सख्खे भाऊ आहेत. या सामन्यात एकाचा अनुभव, तर दुसऱ्याची महत्त्वाकांक्षा पणाला लागली आहे. भारतभूषण यांची बीड पालिकेवरील २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता आहे.

राष्ट्रवादीतील बिनीच्या शिलेदारांची आघाडीत उडी

राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार असलेले विद्यमान नगरसेवक फारुक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, आरेफ खान, खुर्शीद आलम, जयतुल्ला खान, अश्‍फाक इनामदार, अमर नाईकवाडे, खुर्शीद जवारीवाले, शिवाजी जाधव, राजेश क्षीरसागर, विनोद धांडे अशा अकरा जणांनी संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीमध्ये उडी घेतली आहे. याउलट संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असलेला एकही कार्यकर्ता भारतभूषण क्षीरसागर गटाला मिळालेला नाही ही त्यांची जमेची बाजू आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com