चोवीस तासांपूर्वीच द्यावी लागणार ‘स्वीकृत’ची नावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

बीडसाठी सर्वाधिक पाच स्वीकृत सदस्यांची करावी लागणार निवड

बीड - उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयानंतर आता तौलानिक संख्याबळानुसार प्रत्येक पक्ष अथवा गटाला आपल्या वाट्याला येणाऱ्या स्वीकृत सदस्यांसाठीच्या उमेदवारांची नावे पहिल्या बैठकीच्या चोवीस तास अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहेत. जिल्हाधिकारी त्यांची पात्रता तपासून ही यादी नगराध्यक्षांना पाठवतील. नंतर निवडीची प्रक्रिया होणार आहे. याबाबत नगरविकास विभागाने बुधवारी (ता.२१) परिपत्रक काढले आहे.

जिल्ह्यातील बीडसह गेवराई, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई या सहा नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर घोषित झाला. या सहा नगरपालिकांसाठी निवडून आलेल्या सदस्यांचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत नगरपालिकांची पहिली सभा बोलाविणे बंधनकारक आहे. त्यामुळे सहा पालिकांच्या नगराध्यक्षांना ३० डिसेंबरच्या आत पहिल्या बैठकीसाठीची सूचना काढावी लागणार आहे. पहिल्या बैठकीत उपाध्यक्षांची निवड नवनियुक्त नगरसेवकांमधून हात वर करून होणार आहे. यामुळे गट अथवा पक्षाने व्हीप काढल्यास उपाध्यक्ष पदासाठीच्या घोडेबाजारावर मर्यादा येणार आहेत.

याच बैठकीत स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार आहेत. यासाठी बैठकीच्या चोवीस तास अगोदर प्रत्येक पक्षाच्या अथवा गटाच्या गटनेत्याला सभागृहातील त्यांच्या संख्याबळानुसार त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांऐवढी किंवा अधिक सदस्यांची नावे विहित नमुन्यातील अर्ज भरून जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहेत. त्यामुळे पहिल्या बैठकीच्या अगोदरच स्वीकृत सदस्यांबाबतची उत्सुकता संपणार आहे. या अर्जाची छाननी करून पात्र नावांची यादी जिल्हाधिकारी संबंधित नगराध्यक्षांकडे पाठविणार असून, संबंधित पक्षाच्या संख्याबळानुसारच ती नावे असतील, तर ती यादी नगराध्यक्ष जाहीर करतील; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या अनुक्रमाने नावे येतील, त्यातील संबंधित पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांच्या संख्याइतके उमेदवार अनुक्रमे स्वीकृत सदस्य म्हणून जाहीर केले जाणार आहेत. 

अशी असेल पक्षनिहाय संख्या
तौलानिक संख्याबळानुसार बीडमध्ये राष्ट्रवादी आणि आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी दोन; तर एमआयएमच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्यपद येणार आहे. अंबाजोगाईत काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडता येणार आहे. माजलगावमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि सहाल चाऊस यांच्या आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य येईल. धारूरमध्येही भाजप आणि राष्ट्रवादीला एक-एक सदस्य निवडता येणार आहे. परळीत तीनही स्वीकृत सदस्य राष्ट्रवादीचे, तर गेवराईत दोन्ही स्वीकृत सदस्य भाजपचे असणार आहेत.

Web Title: beed municipal selected corporator list