मुलगी मुद्रिकानेच दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग

प्रशांत बर्दापूरकर
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

अंबाजोगाई (जि. बीड) : वंशाचा दिवा मुलगाच, शेवटी पार्थिवाला अग्नीडाग आणि पाणी पाजण्याचा अधिकारही मुलाचाच असा ग्रामीण भागातील समज हळुहळू दुर होत आहे. अंबाजोगाईत विवाहित मुलगी मुद्रिका नाकाडे हिनेच वडिल भानुदास मुंडे यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. अंत्यसंस्कारासाठी रविवारी (ता. ११) सामाजिक संघटनाही सरसावल्या.

डोंगरपिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील मुळ रहिवाशी असलेल्या भानुदास महादेव मुंडे यांना मुलगा नाही. दोन विवाहित मुली आहेत. वृद्धापकाळाने त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर ते अंबाजोगाईतील परळी वेस भागातील समता नगर विवाहित मुलगी मुद्रिका नाकाडे हिच्याकडे राहत होते. ऊसतोडणी करणारी मुलगी मुद्रिका आणि मजुरी काम करणारे जावई भानुदास मुंडे यांचा सांभाळ करत होते. त्यांचेही शनिवारी (ता. १०) रात्री उशिरा वृद्धापकाळाच्या आजाराने निधन झाले. निधनानंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी आणि हक्कही गावाकडील भाऊबंदांनाच असतो. भानुदास मुंडेंच्या निधनाची माहिती कळविल्यानंतर गावाकडून त्यांचे पार्थिव नेण्यासाठी वा अंबाजोगाईत अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही प्रतिसाद दिला नाही. या भागातील महिलांनी अंत्यसंस्कारासाठी वर्गणी गोळा केली व भजन गात रात्र जागून काढली. शेवटी कोणी गावाकडून प्रतिसाद नसल्याने येथील बोरुळ तलावाजवळ त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली. त्यांचे पार्थिव सरणावर मांडल्यानंतर अग्निडाग कोणी द्यायचा अशी कुजबुज सुरु झाल्यानंतर विवाहित मुलगी मुद्रिका नाकाडे हिने आपण अग्निडाग देणार असल्याचे सांगीतले. तीने खंद्यावर मडके घेऊन पार्थिवाला पाच फेऱ्याही मारल्या. ऊसतोडणी मजुरी करणाऱ्या मुद्रिकाने परंपरेच्या भिंती तोडत मुलगीही वंशाचा दिवा ठरू शकते हे दाखवून दिले.

Web Title: beed news ambajogai girl father body funeral