जेथे प्रत्यक्षात कोरोनाचा वावर असतो, तेथे नेमकी कशी घेतात काळजी, वाचा सविस्तर..! 

ambajogai.jpg
ambajogai.jpg

अंबाजोगाई : ज्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कोरोना विषाणुंची चाचणी होते, तेथील डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचा-यांचे काम मोठे जोखमीचे असते, त्यांना या संसर्गाचा धोका असतो, परंतू तिथे हा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी दक्षता घ्यावी लागते. अशी काळजी घेतच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड प्रयोगशाळेत अडीच महिन्यात २३,७९१ हजार स्वॅबची तपासणी झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सव्वा दोन महिन्यापूर्वी (ता.८) जून रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचा प्रारंभ झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना विषाणू स्वॅबची तपासणी या प्रयोगशाळेत सुरू झाली. काही दिवस उस्मानाबाद जिल्ह्याचेही स्वॅब याच प्रयोगशाळेत तपासले गेले. दररोज रात्री बारा वाजेपर्यंत येणा-या स्वॅबचा अहवाल दुसरे दिवशी रात्री ११, कधी बाराच्या नंतरही येऊ लागले. बाहेरच्या जिल्ह्यातील स्वॅब येऊ लागल्याने अहवाल देण्यास उशीर लागत होता. सध्या उस्मानाबादची लॅब झाल्याने तेथील स्वॅब येणे बंद झाले आहे. 

चाचणीची प्रक्रिया 
झिपलॉक बॅगमध्ये आलेल्या स्वॅबच्या बॅग उघडण्यापूर्वी त्यावर अल्कोहोलचा स्पर्पे मारला जातो. त्यानंतर या सर्व बॅग बायोसेफ्टी कॅबीनेट (२ए) या यंत्रात उघडल्या जातात. प्रथम या सँम्पलवर विषाणुला मारणारे द्रव्य टाकले जाते. त्यापुढील सर्व प्रक्रिया मेलेल्या विषाणुवर केली जाते. त्यानंतर घेतलेल्या नमुन्यातून आरएनए वेगळा करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठीही बायोसेफ्टी कॅबीनेट यंत्राचा वापर केला जातो. वेगळ्या झालेल्या आर. एन. ए. मध्ये रिजेन्ट्स टाकुन मास्टरमिक्स तयार केले जाते. ही प्रक्रिया लॅमिनार इयर फ्लो यंत्रात केली जाते. या सर्व प्रक्रियेसाठी १० ते १२ तास लागतात. या सर्व प्रक्रिया प्रयोगशाळेतील वेगवेगळ्या कक्षात तंत्रज्ञ करतात. अखेर अंतिम निदान करण्यासाठी आरटीपीसीआर यंत्राचा वापर केला जातो. जवळपास दीड तासाचा कालावधी यासाठी लागतो. शेवटी ग्राफव्दारे चाचणी करून निदान केले जाते. यातच घेतलेल्या नमुन्यांचे पॉझिटीव्ह व निगेटिव्ह असे निदान होते.

संसर्ग टाळण्याची दक्षता
२४ तास सुरू असलेल्या या प्रयोगशाळेत संसर्ग टाळण्यासाठी मोठी दक्षता व खबरदारी घेतली जाते. काम सुरू होण्यापूर्वी सर्व फ्लोअर व भिंती अल्कोहोल व सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुक केल्या जातात. त्यामुळे चाचणीचा दर्जाही राहतो व संसर्गाचाही धोका राहत नाही. सर्व कर्मचारी व अधिकारी पीपीई कीट घालूनच काम करतात. घरी जाताना व तेथून येताना सर्वांना पूर्णपणे सॅनिटाईज करूनच यावे लागते. कामावरून घरी गेल्यानंतरही अंघोळ करूनच घरात प्रवेश करावा अशा सूचनाच सर्वांना देण्यात आल्या आहेत. सर्व चाचण्या पुलींग पध्दतीने आयसीएमआरच्या मानांकनानुसार केल्या जातात असे सहयोगी प्रा. डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी सांगितले.

तपासणीचा वेग वाढला
या प्रयोगशाळेची दररोज २०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. परंतू. त्यात आता २४ तासात ६०० ते ७०० स्वॅबची तपासणी होऊ लागल्याने तपासणीचा वेग वाढला आहे. शनिवार (ता.१५) पर्यंत यात उस्मानाबादसह बीड जिल्ह्यातील २३,७९१ स्वॅब तपासण्यात आले. त्यातील १८८४ पॉझिटिव्ह, २१६८८ निगेटिव्ह आले. २४ अँन्टिजन टेस्ट झाल्या, त्यातील १२ पॉझिटीव्ह व उर्वरीत निगेटिव्ह आले. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सफाई कर्मचारी असा ३९ जणांचा समूह कार्यरत आहे.  

  • स्वारातीच्या विषाणू संशोधन प्रयोगशाळेत सुरक्षिततेची दक्षता घेत होते चाचणी.
  • अडीच महिन्यांत २३ हजार ७९१ स्वॅबची तपासण्या.
  • दोनशेची क्षमता पण आता सहाशे ते सातशे स्वॅबच्या तपासण्या.

कमी वेळात रिपोर्टचे नियोजन 
यापुढे प्रयोगशाळेत आलेल्या नमुन्याचा २४ तासाच्या आत अहवाल देण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून रुग्णांवर लवकर उपचार सुरू करता येतील. उशीरापर्यंत (रात्री १२) आलेले स्वॅब एकत्र करून तपासणी केली जात होती. यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेले नमुने लागलीच तपासायची, त्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत आलेले, असे दोन टप्यात हा अहवाल देता येईल. त्यासाठी प्रयोगशाळेत आणखी दोन यंत्र व काही मनुष्यबळ वाढवावे लागेल. तसा प्रस्तावही जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. 
डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता , स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com