सासरच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बीड - दवाखाना बांधकामासाठी माहेराहून पैसे आणत नसल्याने होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्‍टरच्या पत्नीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील क्रांतीनगरात बुधवारी (ता.१८) घडली.

बीड - दवाखाना बांधकामासाठी माहेराहून पैसे आणत नसल्याने होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्‍टरच्या पत्नीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील क्रांतीनगरात बुधवारी (ता.१८) घडली.

प्रतीक्षा आशिष गर्जे (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. अशिष गर्जे याच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे माहेर असलेल्या प्रतीक्षा हिचा विवाह चार वर्षांपूर्वी शहरातील डॉ. आशिष भास्करराव गर्जे याच्याशी झाला. विवाहानंतर सहा महिने सुखाचा संसार झाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी दवाखाना इमारत बांधकामासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ सुरू केला. लग्नानंतर प्रतीक्षाला मुलगी झाली असता मुलगा हवा होता, मुलगीच कशी काय झाली? यावरूनही तिला सासरची मंडळी त्रास देत होते. सततच्या छळास कंटाळून प्रतीक्षाने ता. आठ ऑक्‍टोबरला विष प्राशन केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी (नऊ ऑक्‍टोबर) तिचा मृत्यू झाला. 

प्रतीक्षाचे वडील भाऊराव किसनराव घुगे (रा. पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी बुधवारी (ता.१८) शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पती डॉ. आशिष गर्जे, सासरा भास्करराव हौसराव गर्जे, सासू अरुणा भास्करराव गर्जे, नणंद प्रेरणा भास्करराव गर्जे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक सलीम पठाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: beed news crime