स्वच्छतेचा नुसताच डांगोरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बीड - पालिकेतील दोन्ही सत्ताधारी गट स्वच्छतेचा डांगोरा पिटर उद्‌घाटनांचा देखावा करीत आहेत. मात्र, शहरातील तुंबलेल्या नाल्या, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे डासांचे प्रमाण वाढून ताप, सर्दी, खोकला, उलटी अशा आजारांचा फैलाव झाला आहे. आजघडीला एकट्या जिल्हा रुग्णालयात २५ डेंगीचे रुग्ण असून, खासगी रुग्णालये व इतर ठिकाणी डेंगीचा उपचार घेणाऱ्यांचा सध्याचा आकडा शंभर आहे. दरम्यान, रविवारी (ता. २९) चारवर्षीय बालकाचा डेंगीने मृत्यू झाला.

बीड शहराची ओळख घाणीचे शहर अशी होत असतानाच अलीकडे तर पालिकेचा स्वच्छता विभाग पूर्णत: सुस्त असल्याचे दिसत आहे. पालिकेची यावेळेची सत्ता स्थापन झाल्यानंतर स्वच्छतेचा ठेका देण्याच्या कारणावरून सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले. शेवटी आहे तो ठेका कायम ठेवल्यानंतर मागच्या आठवड्यात स्वच्छता मोहिमेचा देखावा पालिकेने केला. दोन्ही गटांनी मोहिमेच्या उद्‌घाटनाचे फोटोसेशन केले खरे; पण स्वच्छता कुठे झाली, हे पदाधिकाऱ्यांनाच माहीत. शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये तुंबलेल्या नाल्या, गटरांतून दुर्गंधी, कचऱ्याचे ढिगारे असे चित्र आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ताप, सर्दी, खोकला, उलटी अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. केवळ जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये आतापर्यंत ७६ जणांना डेंगी आढळून आला. सध्या उपचार घेणाऱ्यांमध्ये २५ पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, खासगी रुग्णालयांमधील सध्या डेंगी रुग्णांची संख्या शंभरीपार आहे. शहर आजाराने ग्रस्त असताना पालिकेतील सत्ताधारी श्रेयवाद आणि आरोपांमध्ये गुंग आहेत. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांवरील नियंत्रण सैल झाल्याने स्वच्छता विभागही सुस्त आहे. त्याच रविवारी पुन्हा एका बालकाचा डेंगीने मृत्यू झाल्यानंतर तरी स्वच्छता होणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

बालकाचा डेंगीने मृत्यू
श्‍लोक जयदीप पवार (वय चार) या बालकाचा रविवारी (ता. २९) डेंगीच्या तापामुळे मृत्यू झाला. श्‍लोक पवार याला शनिवारी ताप आल्याने सुरवातीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उलटी थांबत नसल्याने डॉक्‍टरांनी त्याला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. औरंगाबादला जात असताना उलटी पुन्हा वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारानंतर बालकाला औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. शेवटी औरंगाबाद येथे रुग्णालयात शनिवारी रात्री दीड वाजता बालकाचा मृत्यू झाला.

Web Title: beed news dengue