जिल्हा रुग्णालय उपचारापेक्षा राजकीय श्रेयाचे केंद्र

जिल्हा रुग्णालय उपचारापेक्षा राजकीय श्रेयाचे केंद्र

दत्ता देशमुख
वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी जागा यामुळे काही वॉर्डांचा नुसता कोंडवाडा झाला आहे. जागा मिळण्यासाठीच्या बैठका आणि घोषणेपलीकडे तीन वर्षांपासून काहीही झाले नाही. सीटी स्कॅन बंद असल्याने रुग्णांच्या खिशालाही झळ बसत आहे. 

जिल्हा रुग्णालयाची सध्याची आंतररुग्ण क्षमता ३२० इतकी असून आघाडी सरकारच्या काळात आणखी २०० खाटांना मान्यता मिळाली. या विस्तारीकरणासाठी बाजूलाच असलेल्या गृह विभागाच्या जागेची मागणी आहे. त्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर नुसते प्रयत्न सुरु असून हाती काहीही आलेले नाही. 

यावर मागण्यांचे प्रस्ताव, जागेची पाहणी, बैठका असे अनेक सोपस्कार आणि त्यासाठीची प्रसिद्धी पत्रके यापुढे हाती काहीही आलेले नाही. परिणामी प्रसूती वॉर्डातील महिलांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठका घेऊनही प्रश्न न सुटल्याने ‘घोडे कुठे अडतेय’ हे कळायला मार्ग नाही.  

सीटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने दुर्धर आजाराचे रुग्ण, तापाचे रुग्ण, अपघातील रुग्णांना आवश्‍यक तपासणीसाठी खासगी केंद्रांमध्ये जाऊन खिशाला झळ लावून घ्यावी लागते. अडीच कोटी रुपये किंमतीच्या या यंत्राची खरेदी ‘लवकर’ असे आरोग्य विभागाचे उत्तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. 

त्यातच जिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचा संसर्गही वाढतच चाललेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी (आंतर), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) अशा महत्वाच्या पदांवरही प्रभारी राजच सुरु आहे. अलीकडच्या काळात शस्त्रक्रियांचा आलेखही घसरला असून रेफरचे प्रमाणही वाढले आहे. 

---------------------------------------------------------------------------------------------

भिंतींना भगदाड, छताला तडे
मच्छिंद्र मोरे

तालुक्‍यातील कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अतिशय धोकादायक बनली असून याकडे संबंधित बांधकाम व आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या इमारतीचे बांधकाम १९८४ मध्ये झाले होते. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती विभाग तसेच प्राथमिक उपचार कक्षाच्या भिंतींना भगदाड पडले असून छतांना तडे गेलेले आहेत.

रुग्णांना आरोग्य सेवा देताना कर्मचाऱ्यांना जीव मुठीत ठेवून काम करावे लागत आहे. पावसाळ्यात भिंत कधी कोसळेल याचा भरवसा नसल्याने रुग्ण प्राथमिक रुग्णालयात न येता खासगी रुग्णालयात जाणे सोईस्कर समजतात. याबाबत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम विभाग व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात इमारत धोकादायक असल्याचे एक वर्षापूर्वी कळवलेले आहे, मात्र याची अद्याप दखल घेण्यात आली नाही.

वडवणी तालुक्‍यातील कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार वगळता इतर आरोग्य सुविधा बंद आहेत. प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया विभाग, आरोग्य सहायकाचे कार्यालय, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय या विभागातील भिंतींना मोठमोठे भगदाड पडले असून पडझड झाली आहे. छताला तडे गेलेले असल्याने पावसाच्या पाण्याने या सर्व ठिकाणाला तलावाचे स्वरूप  येते. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत होत्या, मात्र प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे वेळेवर न झाल्याने ही इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन किमान दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.

रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आरोग्य सभापतींशी चर्चा केलेली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. सध्या निधीची कमतरता असल्याने नवीन मंजुरी आराखड्यात समावेश करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या वैशाली सावंत यांनी सांगितले.

---------------------------------------------------------------------------------------------

घरीही धोका आणि रुग्णालयातही...
येथील निवासी कर्मचाऱ्यांची अवस्था ‘मागे आड आणि पुढे विहीर’ अशी झाली आहे. रुग्णालयात गेल्यास भिंती कधी कोसळतील याचा भरवसा नाही, तर घरीदेखील तीच परिस्थिती आहे. कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण दहा कर्मचारी कार्यरत आहेत. यातील सात कर्मचारी निवासी असल्याने कुटुंबासमवेत या ठिकाणी राहतात. शासनाने निवासी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या क्‍वार्टरचीही दयनीय अवस्था आहे. यातील दोन घरे वगळता इतर पाच घरांच्या छताला व भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे घरी आल्यानंतरही कर्मचारी सुरक्षित नाहीत.

इमारत धोकादायक असल्याने केव्हाही कोसळू शकते, असे माजलगाव बांधकाम विभागास एक वर्षापूर्वीच लेखी कळवले होते, त्याची एक प्रत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही दिलेली आहे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया व प्रसूती विभागात आरोग्य सेवा देणे शक्‍य नव्हते. त्यामुळेच हे विभाग बंद ठेवले आहेत. 
- डॉ. डी. एस. राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी, कुप्पा 

मी या रुग्णालयाची पाहणी केली असून रुग्णालयासह निवासी कर्मचाऱ्यांची घरेदेखील जीर्ण झालेली आहेत. ती केव्हाही कोसळतील अशी परिस्थिती आहे. याच्या दुरुस्तीसंदर्भातील अहवाल लवकरच जिल्हा परिषदेकडे देण्यात येईल.
- विमल शिंदे, सभापती, पंचायत समिती, वडवणी

---------------------------------------------------------------------------------------------

अपुऱ्या यंत्रणेवरच चालतो  रुग्णालयाचा कारभार
कमलेश जाब्रस

शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; परंतु जुन्या लोकसंख्येवर आधारित असलेल्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या यंत्रणेवरच रुग्ण्सेवा चालते. माजलगावसारख्या मोठ्या शहरात उपजिल्हा रुग्णालयाची नितांत आवश्‍यकता आहे. 

शहरात जुन्या लोकवस्तीत निजामकालीन प्राथमिक आरोग्य केंद्र होते. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात झाले. आहे त्या इमारतीमध्येच ग्रामीण रुग्णालयातून उपलब्ध डॉक्‍टरांवरच रुग्णसेवा दिली जाते. या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी असून एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. केवळ तीस खाटांचेच हे रुग्णालय असल्यामुळे अनेक वेळा रुग्णांना मिळेल त्या जागेवरच उपचार घ्यावा लागतात. या ठिकाणी रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी असलेले वाटॅर फिल्टर नेहमीच बंद आणि कधीतरी चालू असते. विविध प्रकारच्या लस, औषधींचा साठा उपलब्ध आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाची निजामकालीन इमारत मोडकळीस आली आहे. ग्रामीण रुग्णलाय परिसरात स्वच्छतेचा सातत्याने अभावच आढळून येतो. आरोग्य विभागाने सतर्कतेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. रुग्णांना या अस्वच्छतेमुळे रात्रीच्या वेळी डासांचा नेहमीच त्रास होतो. माजलगाव शहरासाठी उपजिल्हा रुग्णालयाची नितांत आवश्‍यकता असून मागील अनेक दिवसांपासून ही मागणी प्रलंबित आहे. साडेपाच एकर जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी भाटवडगाव शिवारात उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यास या ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय होईल व विविध तज्ज्ञ डॉक्‍टरांची या ठिकाणी नियुक्ती होईल. यामुळे शहरवासीयांना अत्याधुनिक पद्धतीचे उपचार मिळण्यास मदत होऊ शकते. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे प्रत्येकी एक पद रिक्‍त आहे, तर आरोग्य सेविकेची दोन पदे रिक्‍त आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------

चांगल्या आरोग्य सुविधांची अपेक्षा
अनिरुद्ध धर्माधिकारी

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या आष्टी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेला एक प्रकारची मरगळ आल्याचे चित्र आहे. तालुक्‍याच्या ठिकाणचे ग्रामीण रुग्णालय असूनही आरोग्य सेवा मिळण्यात रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी जनतेची अपेक्षा आहे.

आष्टी तालुक्‍याचा विस्तार मोठा असून, त्यासाठी आष्टी येथे एक ग्रामीण रुग्णालय, तसेच तालुक्‍यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३८ उपकेंद्रे आहेत. या सर्वांच्या माध्यमातून तालुक्‍यातील सुमारे दोन लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते; परंतु शहरातील मुख्य ग्रामीण रुग्णालयातच सोयीसुविधांचा अभाव आहे. रुग्णालयातील एक्‍स-रेसह विविध यंत्रणा नेहमीच बंद अवस्थेत असते. किरकोळ तपासणीही रुग्णालयात होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते.

तालुक्‍यातील रुग्णालयांतील अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्याचाही आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला आहे. चार वर्षांपूर्वी आष्टीत ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी मिळून हे काम सुरू करण्यात आले; मात्र इमारत तयार होऊनही अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. त्यासाठी आवश्‍यक उपकरणे व कर्मचारी नियुक्‍त करून हे ट्रॉमा केअर युनिट तातडीने सुरू करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे; मात्र अद्याप या सेंटरच्या उद्‌घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही.

उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव
आष्टीनंतर तालुक्‍यातील सर्वांत मोठे बाजारपेठेचे गाव असलेल्या कडा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. कड्याशी परिसरातील अनेक गावे व खेड्यापाड्यांचा दैनंदिन संबंध येतो; मात्र येथील आरोग्य केंद्रात सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर कडा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. कड्यात ग्रामीण रुग्णालय झाल्यास आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसे झाल्यास रुग्णांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा आष्टी व कडा या गावांत मिळू शकतील. हे लवकर प्रत्यक्षात यावे, अशी जनतेची मागणी आहे.

---------------------------------------------------------------------------------------------
अत्यवस्थ रुग्णांच्या उपचाराची गैरसोय
प्रशांत बर्दापूरकर

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या; परंतु समस्याही अद्याप कायम आहेत. प्राध्यापकांच्या रिक्‍त जागांच्या प्रश्‍नांबरोबरच अतिविशेष उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचाही अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होते.

आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची ओळख आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या सुविधा या रुग्णालयात नसल्या तरी, आहे त्या सुविधा व यंत्रणेवर आणि डॉक्‍टरांच्या प्रयत्नाने अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत; परंतु या रुग्णालयात अतिविशेष उपचारपद्धतीची यंत्रणा नसल्याने अपघातातील गंभीर जखमींना व तीव्र हृदयविकाराच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविण्याची वेळ येते.

रिक्‍त जागांची समस्या
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापकांच्या २०, तर कर्मचाऱ्यांच्या २४ जागा रिक्‍त आहेत. कुठल्याही मोठ्या रुग्णालयाचा क्ष-किरण (रेडिओलॉजी) विभाग हा महत्त्वाचा असतो; परंतु या महाविद्यालय व रुग्णालयाचा हा विभागच बंद असल्याने कंत्राटी तत्त्वावर नियुक्‍त केलेल्या डॉक्‍टरांवरच सोनोग्राफी व सीटीस्कॅन तात्पुरत्या स्वरूपात चालविले जाते. बाह्यरुग्ण विभागाचा कालावधी व अत्यावश्‍यक रुग्ण आल्यानंतरच विभाग सुरू असतो. या विभागात प्राध्यापकांच्या सर्वच जागा रिक्‍त असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली नाही. अस्थिरोग विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही मान्यता नसल्याने स्पाईन (मनक्‍याच्या) शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत.

त्वचारोग, क्षयरोग, मानसरोग या विभागातील सर्वच जागा रिक्‍त असल्याने या विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासही मान्यता नाही. बालरोग विभाग व मेडिसीन विभागातही रिक्‍त जागा आहेत. मेंदू विकार तज्ज्ञ, मुत्ररोग तज्ज्ञही उपलब्ध नाहीत.  

वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता पन्नास वरून शंभर होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप वाढीव जागांच्या मुलांसाठी वसतिगृहांची सोय झालेली नाही. या चारही वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या आता पाचशे झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे वसतिगृह कमी पडत आहेत. ही समस्या कधी दूर होईल, याची वाट बघण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

सुविधा
वर्षभरापासून या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही सुविधा निर्माण झाल्या. त्यात प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी दोन सीबीसी यंत्र कार्यान्वित करण्यात आले. मुख्य म्हणजे क्ष-किरण विभागात कंत्राटी पद्धतीने जागा भरून सोनोग्राफी यंत्रणा सुरू करण्यात आली. रक्‍त बदलण्यासाठी डायलिसिस यंत्रही कार्यान्वित करण्यात आले. नवीन सर्जिकल इमारतीत सर्जरी विभागाचे स्वतंत्र सर्जिकल आयसीयू युनिट उभारण्यात आले. रुग्णांच्या समुपदेशनासाठी वेल्नेट क्‍लिनिक कक्ष सुरू करण्यात आला.  या सुविधा निर्माण झाल्या तरी रिक्‍त जागा व यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे रुग्णालयात समस्याच असल्याचे जाणवते.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा आणि यंत्रसामुग्रीचा प्रश्‍न मार्गी लागल्यास रुग्णांची सोय होईल. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले. अतिविशेष उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा अभाव असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना रेफर करण्याची वेळ येते, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

यंत्रसामुग्रीचा अभाव
रुग्णालयाच्या विविध विभागांत यंत्रसामुग्रीचाही अभाव आहे. रुग्णांचे अचूक निदान होण्यासाठी एमआरआय, एक्‍सरे यंत्र, डी. एस. ए. (अँजिओग्राफी), कर्करोगाचे निदान होण्यासाठी मॅमोग्राफी, मेडिसीन विभागात अत्यवस्थ रुग्णांसाठी व्हेंटिलेटर अशा यंत्राणाचा अभाव या रुग्णालयात आहे.

रस्ते व निजामकालीन ड्रेनेज 
रुग्णालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी चांगले रस्ते व ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित असणे आवश्‍यक असते; परंतु या रुग्णालयात व परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रुग्णालयाला लागून असलेले ड्रेनेज ही निमाजकालीन आहेत. अशा परिस्थितीमुळे दुर्गंधी पसरून रुग्णांनाच जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता मोठी आहे. 

---------------------------------------------------------------------------------------------

ट्रॉमा केअर केवळ नावापुरतेच
जगदीश बेदरे

येथील उपजिल्हा रुग्णालयात अडीच वर्षांपूर्वी ट्रॉमा केअर सुरू करण्यात आले; मात्र शस्त्रक्रियेसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसून स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची कमतरता असल्याने येथील ट्रामा केअर काही कामाचेच नसल्याची स्थिती आहे, हे रुग्णालय केवळ रुग्णांना बीडला रेफर करण्याचेच ठरू लागले आहे. 
गेवराई शहरातून धुळे, सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. दररोज या महामार्गावरून असंख्य वाहनांची वाहतूक सुरू असते, त्यामुळे महामार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात होतात. अपघातात गंभीर रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. अडीच वर्षांपूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयालगत लाखो रुपये खर्च करून ट्रॉमा केअर सुरू करण्यात आले; परंतु येथे शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या  महत्त्वपूर्ण साहित्याची कमतरता असून फक्त प्लास्टर मटेरियल काही प्रमाणात उपलब्ध आहे.  

स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची कमतरता आहे. अपघातग्रस्त रुग्णांना मलमपट्टी करून सरळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात किंवा औरंगाबादला रेफर केले जाते. यामुळे हे रुग्णालय रेफर रुग्णालय बनले आहे. 

तालुक्‍यात सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल आजाराच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत; मात्र ग्रामीण आरोग्य यंत्रणाही लक्ष देऊन काम करीत नसल्याने  खासगी रुग्णालयांचा रुग्णांना आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येते. 

गेल्या पंधरवड्यात डॉक्‍टरांच्या दुर्लक्षामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता तालुक्‍यातील रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आणण्यापेक्षा खासगी रुग्णालयात किंवा बीड येथील जिल्हा रुग्णालयात नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या काही डॉक्‍टरांचे खासगी दवाखाने आहेत, त्याकडेच ते अधिक लक्ष देऊन आपल्या सोयीनुसार या ठिकाणी काम करीत असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही वेळा या डॉक्‍टरांना फोन करून बोलवावे लागते, असा रुग्णांचा अनुभव आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठांचे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने सर्वांचीच मनमानी सुरू असल्याचे दिसते.

---------------------------------------------------------------------------------------------

दोन रुग्णालये असूनही उपचारासाठी रुग्णांची अडचण
प्रकाश काळे

शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने चालविले जाणारे नागरी रुग्णालय आणि शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चालविले जाणारे ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु दोन्ही ठिकाणी पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने मोठी रुग्णसंख्या असूनही रुग्णसेवेत असंख्य अडचणी आहेत. 

हे प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी पुरेसे लक्ष देत नाहीत. तालुक्‍यातील रुग्णासांठी शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय चालविले जाते. येथे दररोज सरासरी तीनशेहून अधिक बाह्यरुग्णसंख्या असते. त्यासोबत आंतररुग्णाची संख्याही मोठी असते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांसह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिविक्षाधीन वैद्यकीय अधिकाऱ्यावर ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज चालते. कामकाज चालविण्यासाठी आयुष आणि शालेय तपासणी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साहाय्य घेतले जाते. रुग्णालयात क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तपासणीस, एक कक्षसेवक आणि एक सफाई कामगारांची पदे रिक्त आहेत. यामुळे आवश्‍यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत आणि सुरळीत रुग्णसेवा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकारी, पाच परिचारिका आणि तीन शिपायासांठी निवासस्थाने बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. परंतु केवळ विद्युत पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांचे हस्तांतरण रखडले आहे. 

शहराच्या एका भागात नागरी रुग्णालय आहे. दररोज सरासरी तीस ते चाळीस बाह्यरुग्णांची संख्या असते. नऊ वर्षानंतर सामाजिक कार्यकर्त्यानी केलेल्या हालचालीमुळे रुग्णालयास महिला वैद्यकीय अधिकारी मिळाल्या आहेत. परंतु पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. येथे औषधीही मिळत नाहीत. त्यामुळे कसेबसे सलाईनवर नागरी रुग्णालय चालविले जाते. 

तालुक्‍यात भोगलवाडी आणि मोहीखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. भोगलवाडी येथे एक वैद्यकीय अधिकारी आणि मोहीखेड येथे एक वैद्यकीय अधिकारी काम पाहत आहेत. २०१२ पासून नागरी रुग्णालयात औषध निर्माता नाही. परिचारिकाही निवृत्त झाल्या आहेत. यामुळे भोगलवाडी आणि मोहीखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना बोलाविण्यात येते. जिल्हा परिषदेकडून औषध निर्माता आणि परिचारिकांची अद्याप नियुक्ती नाही. महिला वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्यानंतर मी स्वतः बाह्यरुग्णांची तपासणी करून उपचार करतो, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com