शिक्षण व्यवस्थाच संपविण्याचे सरकारचे धोरण - कन्हैयाकुमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

बीड - शिक्षण घेतले तर आम्ही प्रश्‍न विचारायला शिकू, शोषण होत असल्यास आपल्याला शिक्षणामुळे त्याची जाणीव होईल, यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशवासीयांना शिकण्याचा सल्ला दिला होता; मात्र या सरकारला हेच नको आहे. शोषित वर्ग शिकला तर तो प्रश्‍न विचारेल, म्हणून शिक्षण व्यवस्थेवरच हल्ले केले जात आहेत. सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था तयार केली जात आहे. याविरोधात देशाला लढावे लागेल, असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केले.

संविधान बचाव लाँग मार्चनिमित्त कन्हैयाकुमार यांच्या बीड दौऱ्यात येथील हॉटेल अन्विता येथे आयोजित ‘कॉफी विथ कन्हैया’ या कार्यक्रमात कन्हैयाकुमारने उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रा. डॉ. हमराज वुईके यांनी कन्हैयाकुमारची यावेळी प्रकट मुलाखत घेतली. यात कन्हैयाकुमारने अनेक विषयांवरील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

महाराष्ट्राला क्रांतीचा इतिहास आहे आणि ‘आझादीचा नारा’ हा काही आपण पहिल्यांदा दिला नाही. आज वर्णवाद, भांडवलशाही, सरंजामशाही याच्याविरोधात आम्ही ‘आझादी’ मागत आहोत. मोदी जसे या देशाचे नागरिक आहेत, तसाच मीही या देशाचा नागरिक आहे. प्रत्येक माणूस या देशावर जितके प्रेम करतो तितकेच प्रेम मीदेखील करतो, असे सांगत कन्हैयाकुमार यांनी त्यांच्यावरील देशद्रोहाचे आरोप धुडकावून लावले.

एका गरीब कुटुंबातून आलेला मी विद्यार्थी आहे; मात्र या देशात गरीब असणे हाच गुन्हा आहे. तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला चोर, बेईमान, दंगलखोर, देशद्रोही काहीही ठरवता येते. गरीब असून तुम्ही शिकता हा तर फार मोठा गुन्हा आहे. कारण तुम्ही शिकून प्रश्‍न विचारता आणि सत्तेला प्रश्‍न नको आहेत. जर नरेंद्र मोदी पस्तिसाव्या वर्षी एम. ए. करू शकतात तर तिसाव्या वर्षी मी पीएच.डी. केली तर माझ्यावर प्रश्‍न का उपस्थित होतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आम्ही शिकलो तर यांची गुलामी कोणी करणार नाही. त्यामुळे त्यांनी सामान्यांचे शिक्षण बंद केले आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यावर जेवढा पैसा खर्च होतो, त्याच्या निम्यामध्ये बंद पाडलेली विद्यापीठातील फेलोशिप सुरू होऊ शकते; मात्र सरकारला हे करायचे नाही. विचार करणारे लोक सरकारला नको असून विद्यापीठामधून केवळ मशिन तयार व्हाव्यात, अशी या सरकारची धारणा आहे आणि हेच बदलण्यासाठी विद्यार्थी चळवळी महत्वाच्या असल्याचे कन्हैयाकुमार यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: beed news education Kanhaiya Kumar