...तर शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटींची माफी 

दत्ता देशमुख
गुरुवार, 15 जून 2017

बीड - सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्यण घेतला असला तरी त्यामध्ये ‘तत्त्वत:’ आणि ‘निकषांअधारे’ हे दोन शब्द घुसडले आहेत. त्यामुळे कुठलीच स्पष्टता नसली तरी यामधील अल्पभूधारक, मध्यम भूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटी रुपयांची माफी पडेल, असा जाणकारांचा अंदाज आहे; 

तसेच मागच्या वर्षभरात खरीप पीकविमा, नुकसानभरपाई आदी माध्यमांतून शेतकऱ्यांच्या पदरात साधारण १७०० कोटी रुपयांची रक्कम पडली आहे. 

बीड - सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्यण घेतला असला तरी त्यामध्ये ‘तत्त्वत:’ आणि ‘निकषांअधारे’ हे दोन शब्द घुसडले आहेत. त्यामुळे कुठलीच स्पष्टता नसली तरी यामधील अल्पभूधारक, मध्यम भूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटी रुपयांची माफी पडेल, असा जाणकारांचा अंदाज आहे; 

तसेच मागच्या वर्षभरात खरीप पीकविमा, नुकसानभरपाई आदी माध्यमांतून शेतकऱ्यांच्या पदरात साधारण १७०० कोटी रुपयांची रक्कम पडली आहे. 

शेतकऱ्यांना सरकसट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात एक जूनपासून शेतकरी संप होता. मागच्या चार वर्षांच्या काळात जिल्ह्याने अनुभवलेला सर्वाधिक दुष्काळ आणि सर्वाधिक आत्महत्यांमुळे जिल्ह्यात संपाची धार अधिक तीव्र होती. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सर्वच स्तरांतून मागणी होती. त्यामुळे संप काळात नऊ लाख लिटर दुधाचे संकलनच झाले नाही. भाजीपाल्याचे कडाडलेले भाव, बंद आदी परिणाम जिल्ह्यात जाणवले. दरम्यान, सुरवातीला काही नेत्यांना हाताशी धरून कर्जमाफीची घोषणा झाली; पण ही सरकारकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि पुन्हा संप झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी आणि त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी ‘सरसकट’ हा शब्द यामध्ये वापरला आहे; पण ‘तत्त्वत:’ आणि ‘निकष’ या दोन शब्दांच्या खेळाने शेतकऱ्यांसह महसूल, सहकार आणि बॅंक क्षेत्रातील मंडळी चक्रावून गेली आहे. मात्र, अल्पभूधारक व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना जरी कर्जमाफी दिली तरी जिल्ह्यातील साधारण सव्वादोन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज महसूल, कृषी, सहकार व बॅंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. जिल्ह्याच्या वाट्याला कर्जमाफीपोटी किमान एक हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. मात्र, हे सर्व शासन निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.

वर्षभरात आले १७०० कोटी
२०१५ मधील खरीप पीक विम्यापोटी मागील वर्षाच्या सुरवातीला ८९२ कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले होते. त्यानंतर पीक नुकसान भरपाईपोटी ३३३ कोटी रुपये मिळाले होते. रब्बी पीक विम्याचे २५० कोटी रुपये मिळाले होते. आता मागच्या हंगामातील खरीप पीक विम्याचे तीनशे कोटी रुपये आले आहेत, अशी एकूण साधारण १७०० कोटी रुपयांची रक्कम मागील पेरणी हंगामापासून शेतकऱ्यांना मिळाली आहे. 

जिल्हा बॅंक उभारण्याची आशा दुणावली
आर्थिक अनियमिततेमुळे मागच्या चार वर्षांपासून जिल्हा बॅंकेतील देवाण- घेवाण बंदच आहे. सध्या बॅंकेतून पीकविमा भरून घेणे व वाटप करणे, पीक कर्जांचे केवळ कागदपत्रांवर सह्या घेऊन नवीन जुने करणे असेच व्यवहार सुरू आहेत. इतर बॅंकिंग व्यवहार बंदच आहेत. बॅंकेचे साधारण एक हजार कोटींवर कर्ज आहे. तर बॅंकेकडे सहाशे कोटींवर ठेवी आहेत. यातील ३८७ कोटी रुपये पीक कर्ज, तर दोनशेवर कोटींचे अल्पमुदत कर्ज आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट माफी दिली तर बॅंकेला साधारण साडेचारशे कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे. या बॅंकेच्या बहुतेक कर्जदारांनी इतर बॅंकांकडून कर्ज घेतल्याने त्यांना पुन्हा इथे कर्ज मागता येणार नाही. त्यामुळे बॅंकेकडे चारशे कोटी रुपयांपर्यंत खेळते भांडवल राहील व बॅंकेचे बंद पडलेले कॅश काउंटर सुरू होऊ शकेल. एकूणच बॅंकेवर सध्याही सत्ताधारी भाजप प्रणीत संचालक मंडळ असले तरी ते बॅंकेला मदत मिळवूही शकले नव्हते आणि बॅंक सुरूही करू शकले नव्हते; पण कर्जमाफी बॅंकेच्या पथ्थ्यावर पडण्याचा अंदाज आहे.

पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे दीड हजार कोटींचे कर्ज
जिल्ह्यात ३१ मार्च २०१७ पर्यंत दोन लाख ८८ हजार शेतकऱ्यांकडे १५७१ कोटी रुपयांचे पीककर्ज आहे. यामध्ये मागच्या वर्षीच्या खरिपाचे १३५६ कोटी, तर मागच्या वर्षीच्या रब्बीच्या १६० कोटी रुपयांचा समावेश आहे. मागच्या दुष्काळात पीक कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० हजार ९५७ असून त्यांच्याकडे २५३ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Web Title: beed news farmer loan