देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

संविधान बचाव लॉंग मार्चमध्ये कन्हैयाकुमारचे प्रतिपादन
 

बीड : ""देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गतवर्षी 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरुण बेरोजगार होत आहेत. विदेशात फिरून आणि सूट बदलून देश बदलणार नाही, हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे आहे,'' अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

"एआयएसएफ'चा संविधान बचाव लॉंग मार्च रविवारी बीडला पोचला. त्या निमित्त आशीर्वाद लॉन्समध्ये आयोजित "रोहित ऍक्‍ट परिषदे'त ते बोलत होते.
""शेतमालाला हमीभावाचा वायदा करणाऱ्या पंतप्रधानांनी "पंतप्रधान पीकविमा योजने'चा गाजावाजा केला. प्रत्यक्षात पिकांना नुकसानभरपाई तुटपुंजी मिळाली; मात्र विमा कंपनीला वर्षाकाठी 10 हजार कोटींचा नफा झाला. दुसरीकडे तीन वर्षांत 60 हजार कोटी खर्च करूनही गंगा नदीचे पात्र दूषितच आहे.

हा अनाठायी खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना मदतस्वरूपात दिला गेला असता तर शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात थांबल्या असत्या,'' असे सांगत दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या न्यायासाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी देशातील तरुणांनी मौन सोडून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले.

Web Title: beed news kanhaiya kumar PM narendra modi foreign tours