केज तालुक्‍यात केंद्रीय मार्ग निधीमधील कामाच्या तक्रारी

केज तालुक्‍यात केंद्रीय मार्ग निधीमधील कामाच्या तक्रारी

बीड - केज तालुक्‍यातून मोठ-मोठे रस्ते होत असल्याने भविष्यात दळणवळणाच्या सुविधा होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असतानाच प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत तक्रारी उपस्थित होत आहेत. मातीमिश्रित वाळू, पुलांची कामे एकाच बाजूने असे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

तालुक्‍याचा दक्षिण भाग काळ्या जमिनीचा, तर उत्तर भाग हा डोंगराळ आहे. काळ्या जमिनीच्या भागातले रस्ते खचतात, तर डोंगराळ भागात वर्षानुवर्षे रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. त्यातल्या त्यात झालेली कामे आणि दुरुस्त्या कागदावर झाल्याने केज तालुका हा दयनीय रस्त्यांची राजधानी असाच आहे. दरम्यान, केंद्र सरकारने रस्ता सुधारणांची कामे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने जिल्ह्यात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण होत आहे. त्यात केजमधूनही यातील काही मार्ग जात आहे. सुरवातीला पाहणी आणि मंजुरीच्या घोषणा झाल्यानंतर तालुक्‍यातील लोकांना हायसे वाटले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर लोकांमधून तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. रस्त्यांची घोषणा करणारे लोकप्रतिनिधींचे या कामांकडे लक्ष नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. यातील केंद्रीय मार्ग निधीतून पिंपरी, बोरगाव, भोपला, मस्साजोग, शिंधी, विडा ते हिवरापहाडी (ता. बीड) हा ३३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे  काम सुरू आहे. २१ कोटी ५० लाख रुपये निधीतून १० मीटर रुंद रस्ता आणि यावरील ३९ पुलांची कामे केली जाणार आहेत. मात्र, सद्यःस्थितीतील खोदकाम, मातीभरण आणि पुलांची कामे पाहता दर्जाबाबत तक्रारींचे पाढे सुरू आहेत. पण, लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदार आणि कंत्राटदारांच्या मर्जीतील बांधकाम विभागाच्या यंत्रणेमुळे लोकांच्या तक्रारींकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही. मंगळवारी शिंधी ते कोरडेवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलांच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य निकृष्ट आढळून आले. 

पुलांच्या बांधकामासाठी वापरली जात असलेली वाळू मातीमिश्रीत होती, तर सिमेंटही नामांकित कंपनीचे नव्हते. नवीनच काम झालेल्या पुलाचा एक सिमेंट रोलही तुटून गेला होता, तर पूल करताना जुना पूल पूर्ण खोदून नवीन नळ्या टाकून पूल करणे गरजेचे असताना एकाच बाजूने नळ्या टाकून निम्म्या नळ्या आणि निम्मा पूल जुनाच ठेवल्याचे दिसले. कामाच्या दर्जाबाबत तक्रारी करूनही कामात सुधारणा होत नसल्याने आंदोलनाचा इशारा विडा येथील युवकांनी दिला आहे. 

सध्या माती भराव टाकण्याचे काम सुरू असून मजबुतीकरणाचे काम सुुरू झाल्यानंतर दर्जा लक्षात येईल. सध्या पुलांच्या कामासाठी टाकलेली वाळू बदलण्यास सांगितली असून गुराखी मुलांनी कठडा तोडला आहे. अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी पुलांच्या जुन्या नळ्या वापरल्या आहेत. एकाच भागाने पूल बनवले आहेत. माझ्यासह इतर शाखा अभियंता आणि अधिकाऱ्यांची कामाला नियमित भेट असून काम दर्जेदार करून घेऊ.
- आर. आर. गिराम,  शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, केज.

कोणाच्या हितासाठी बदलला मार्ग?
दरम्यान, हिरवरापहाडी, कोरडेवाडी, विडा, पिंपळगाव ते जामखेड-अमदपूर या राज्य मार्गाला जोडणारा रस्ता पूर्वीपासून आहे. या रस्त्याने मस्साजोगहून पिंपरीला जोडणारा रस्ता सोयीचा आणि सरळ होता. पण, यातील पिंपळगाव ते विडा हा सोयीचा आणि सरळ मार्ग बदलून हा मार्ग मस्साजोगहून शिंधी आणि पुढे विडा असा वाढवला आहे. त्यामुळे रस्त्याचे चार किलोमिटरचे अंतर वाढून कामाचा आणि त्यासाठीच्या भूसंपादनासाठीचा खर्च वाढला आहे. यासाठी पिंपळगावच्या रहिवाशांनी शासकीय कार्यालयांपासून नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवूनही कोणी दखल घेतली नाही. 

एकीकडे ‘सेल्फी विथ खड्डे’ अन्‌...
राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘सेल्फी विथ खड्डे’ मोहीम राबवली. जिल्हा, तालुक्‍यातील नेत्यांनीही असे फोटो काढून सोशल मीडियावर टाकून हाईट्‌स मिळवल्या. पण, या कामाबाबत राष्ट्रवादीचे नेते का बोलत नाहीत, याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता हे कामच ‘सेल्फी वीथ खड्डेवाल्या’शी संबंधितांचे असल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com