‘ये तो सिर्फ झाकी है’चा घुमला आवाज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

बीड - मुंबई येथे नऊ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी (ता. पाच) शहरातून निघालेल्या दुचाकी फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. फेरीत महिलांचा मोठा सहभाग तर होताच शिवाय त्यांनी घोषणाही दिल्या. ‘ये तो सिर्फ झाकी है, मुंबई अभी बाकी है’ यासह विविध घोषणांनी बीड दणाणून गेले. महिलांनी नेतृत्व केलेली ही दुचाकी फेरी दोन तास चालली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

बीड - मुंबई येथे नऊ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी (ता. पाच) शहरातून निघालेल्या दुचाकी फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. फेरीत महिलांचा मोठा सहभाग तर होताच शिवाय त्यांनी घोषणाही दिल्या. ‘ये तो सिर्फ झाकी है, मुंबई अभी बाकी है’ यासह विविध घोषणांनी बीड दणाणून गेले. महिलांनी नेतृत्व केलेली ही दुचाकी फेरी दोन तास चालली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

कोपर्डी (जि. अहमदनगर) घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी, मराठा आरक्षण लागू करावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नऊ ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाभर बैठका होत आहेत. मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी शहरातून मराठा समाजबांधवांनी एकत्र येत दुचाकी फेरी काढली. शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून फेरीला सुरवात झाली. महिलांनी नेतृत्व केलेल्या फेरीतील प्रत्येक दुचाकीला भगवे झेंडे, डोक्‍यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या, गमजे घालून महिला आणि समाजबांधव फेरीत सहभागी झाले होते. जिजामाता चौक, मोंढा रोड, भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा, माळीवेस, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, जिजामाता उद्यान या मार्गावरून ही फेरी निघाली. जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. फेरीत वयोवृद्ध, युवकही सहभागी झाले होते. 

महाविद्यालयातील युवकांचा सहभाग लक्षणीय होता. दोन तास चाललेली फेरी शिस्तीत पार पडली. कुठलाही गोंधळ उडाला नाही.

घोषणांनी दणाणले बीड
दरम्यान, फेरीत सहभागी झालेल्यांनी ‘ये तो सिर्फ झाकी है, मुंबई अभी बाकी है’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘चलो मुंबई’ अशा एक स्वरात घोषणा दिल्या. घोषणांनी बीड दणाणून गेले.

वृद्ध, लहान मुलांनी वेधले लक्ष
दुचाकी फेरीत वयोवृद्धांनीदेखील सहभाग नोंदविला होता, त्यांचा उत्साह अगदी तरुणांप्रमाणे दिसून आला. याचबरोबर महिलांसोबत लहान मुलेही दिसून आली. चिमुकल्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तगडा पोलिस बंदोबस्त
तिडके प्रकरणात शिवप्रेमींनी काढलेल्या फेरीत दगडफेक झाली होती, तसा प्रकार होऊ नये याची काळजी घेत पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. शहरातील विविध चौकांत पोलिस तैनात करण्यात आले होते. शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा
कोपर्डी घटनेतील आरोपींना वर्षे उलटूनही शिक्षा होत नाही, मराठा आरक्षणाचा विषय रेंगाळलेला असून यास सरकारच जबाबदार असल्याची भावना निर्माण झालेली असून या भावनेला मोर्चात मुख्यमंत्रीविरोधी घोषणा देऊन वाट मोकळी करून देण्यात आली. 

Web Title: beed news maratha kranti morcha