ना पुरेशा बस, ना सोयी-सुविधा

ना पुरेशा बस, ना सोयी-सुविधा

परळी वैजनाथ - बीड जिल्ह्यासह व मराठवाड्यातील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून एकेकाळी नावलौकिक मिळवलेल्या परळी येथील बसस्थानकाची सध्या मोठी दुरवस्था झाली असून या बसस्थानकाच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांना वेळ नाही, विकासकामाला निधी देण्यासाठी एसटी महामंडळ उदासीन आहे आणि स्थानिक पुढाऱ्यांनी तर बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. 

परळी शहर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, बाजारपेठ यामुळे येथे दररोज भाविक, उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने येतात. भाविकांच्या गर्दीने बसस्थानक सतत गजबजलेले असते. महाराष्ट्रासह परराज्यांतूनही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. परळीतून पूर्वी राज्यातल्या प्रमुख ठिकाणांसह परराज्यांतही थेट बससेवा होती. परंतु अलीकडच्या काळात अनेक बस बंद करण्यात आल्या आहेत. 

सध्या येथील बस आगारात सुमारे ७० बस आहेत. त्यातील काही बस सुस्थितीत असल्या तरी इतर बसेसची अवस्था बिकट आहे. येथे सुमारे तीनशेवर कर्मचारी आहेत. हैदराबाद, गुलबर्गा, बिदर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरात पूर्वी येथून बससेवा होती. ही सेवा बंद करण्यात आली आहे. विदर्भात परळीतून जाण्यासाठी खूप कमी बस आहेत. शिर्डीला थेट बससेवा नाही. शेगाव, शिर्डी,  श्रीक्षेत्र गाणगापूर अशा प्रमुख तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बस सोडण्याची मागणी होऊनही त्याची दखल घेतली जात नाही. तेलगाव- बीड मार्गे पुण्याला बस नाही. या आगारातून बस सोडण्याबाबत कोणतेही नियोजन नाही. एकाचवेळी एखाद्या शहराला जाण्यासाठी तीन- तीन, चार-चार बस बसस्थानकात लागलेल्या असतात. येरमाळा- कळंब मार्गे पुण्याला जाण्यासाठी अपुऱ्या बस आहेत. उदगीर, बिदरला थेट बस नाहीत. उमरगा, गुलबर्गा या शहरासही जाण्यास मुबलक बस येथील आगारातून नाहीत. औरंगाबाद येथून परळीला येण्यासाठी रात्री बस नाही. रात्री तेलगाव मार्गे बीड, बीडहून तेलगाव मार्गे परळी अशी सेवाही नाही. त्यामुळे रात्री साडेआठनंतर बीडहून परळीला व परळीहून बीडकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. चौकशी कक्ष रात्री दहापर्यंत चालू असतो. त्यानंतर बंद केला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसची चौकशी कोणाकडे करावी, हा प्रश्न प्रवाशांपुढे असतो. ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस या-ना-त्या कारणाने बंद केल्या आहेत. बसस्थानकात केलेले डांबरीकरण उखडल्याने मोठमोठाले खड्डे पडले आहेत. 

स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही येथे सोय नाही. अवैध प्रवासी वाहतूकही फोफावली असून ही वाहने बसस्थानक परिसरात तळ ठोकून असतात. परळीहून अंबाजोगाई, लातूर, गंगाखेडला दररोज शेकडो प्रवासी ये- जा करतात. अंबाजोगाई व लातूरला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु या दोन्हीही ठिकाणी अपुऱ्या बस आहेत. 

सलग अर्ध्या तासाला परळीहून अंबाजोगाईकडे जाण्यासाठी बस असावी, अशी मागणी केली जात आहे. येथील शिवाजी चौक, आझाद चौक, सिंचन भवन, बॅंक कॉलनी, संभाजी चौक, इटके कॉर्नर येथे बसथांबे आहेत, परंतु येथे बसेस थांबवल्या जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com