बीडमध्ये दोन दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

बीड - बीड शहरात मंगळवारी (ता. १९) सात ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता.२०) जुना मोंढा भागातील दोन व्यापाऱ्यांची दुकाने फोडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांच्या मुद्देमालासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा संचही पळवून नेला. यामुळे पोलिस यंत्रणाही गांगरून गेली आहे. दरम्यान, दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने चोरी केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. बीडमध्ये चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जुना मोंढा भागातील साखर व तेलाचे व्यापारी सतीश डुंगरवाल यांच्या मालकीच्या चंपालाल झुंबरलाल डुंगरवाल ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे समोरचे मोठे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करीत गल्ल्यातील पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली. ज्या सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले होते त्या सीसीटीव्हीचा संच बॉक्‍सही चोरट्यांनी लांबविला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून जवळच असलेल्या जवाहरलाल कलंत्री यांच्या मालकीचे कांकरिया ट्रेडिंग कंपनी येथील शटरच्या कुलुपाजवळील पट्ट्या कापून आतमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याचे सांगितले गेले. दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी एकाच पद्धतीचा अवलंब केला आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पेठबीड पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक पाबळे, कॉन्स्टेबल शेख, जायभाये यांनी पंचनामा केला. या वेळी ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, सलग दोन दिवस चोरीच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

संदीप क्षीरसागरांनी दिली घटनास्थळी भेट 
जुना मोंढा भागात एकाच रात्री दोन व्यापाऱ्यांची दुकाने फोडल्याची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर, सभापती अमर नाईकवाडे, ॲड. इरफान बागवान आदींनी घटनास्थळाला भेट दिली. व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मोंढा भागात पोलिस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असता संदीप क्षीरसागर यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मोंढा भागात पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी केली.

Web Title: beed news robbery crime