जिल्‍हा परिषद स्वच्छता विभागाच्या गाडीचा वेग दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने चांगलीच मनावर घेतली आहे. जिल्ह्यासाठी दर आठवड्याला ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट स्वच्छतागृहांचे बांधकाम होत आहे. विशेष म्हणजे, मागच्या सात महिन्यांत तब्बल एक लाख दोन हजार बांधकामे झाली आहेत. तर, तीन महिन्यांत जिल्ह्याने राज्यात ३४ व्या क्रमांकावरून थेट २१ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने चांगलीच मनावर घेतली आहे. जिल्ह्यासाठी दर आठवड्याला ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट स्वच्छतागृहांचे बांधकाम होत आहे. विशेष म्हणजे, मागच्या सात महिन्यांत तब्बल एक लाख दोन हजार बांधकामे झाली आहेत. तर, तीन महिन्यांत जिल्ह्याने राज्यात ३४ व्या क्रमांकावरून थेट २१ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

स्वच्छ भारत मिशनमधून बीड जिल्ह्यासाठी तीन लाख ५७ हजार ६९८ वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट आहे. यातील तीन लाख पाच हजार ५८६ स्वच्छतागृहांचे बांधकामे झाली आहेत. मात्र, एवढे करूनही स्वच्छ भारत मिशनमध्ये मधल्या काळात बीड जिल्हा राज्यात ३४ व्या क्रमांकावर होता. मात्र, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी या विभागाला चांगलेच कामाला लावले. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांनीही यामध्ये झोकून दिल्याने जिल्ह्यात मागच्या सात महिन्यांत तब्बल एक लाख दोन हजार स्वच्छतागृहे बांधकामे करण्यात यश मिळाले आहे. जिल्ह्याचे आतापर्यंतचे ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या ८५.४३ टक्के काम झाले आहे. जिल्ह्यातील धारूर, वडवणी, शिरूर कासार, अंबाजोगाई व पाटोदा ही तालुके पाणंदमुक्त जाहीर करण्यात आल्याचे धनराज निला यांनी ‘सकाळ’ला सांगितले. तर परळी अंतिम टप्प्यात असून माजलगाव, आष्टी व शेवटी बीड तालुका पाणंदमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नोव्हेंबरपर्यंत पाणंदमुक्त होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

नोव्हेंबरपर्यंत जिल्हा पाणंदमुक्त करण्याचे नियोजन आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छता विभागासह स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम सुरू केल्याने आमचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्‍वास आहे. आम्हाला ३४ व्या स्थानावरून २१ व्या स्थानापर्यंत मजल मारता आल्याचा आनंद आहे.
- धनराज निला, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

३४ वरून २१ व्या स्थानावर
स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्ह्यात समाधानकारक काम सुरू असले, तरी मधल्या काळात जिल्हा राज्यात ३४ व्या स्थानावर होता. मात्र, मागच्या तीन महिन्यांत या मोहिमेतून वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामास वेग आल्याने आता ३४ वरुन २१ व्या स्थानावर जिल्ह्याने झेप घेतली आहे.

उद्दिष्टांपेक्षा अधिक काम
दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता विभागाला दर आठवड्याला जिल्हा परिषदेला आठवड्याला तीन हजार ६१८ स्वच्छतागृहांची बांधकामे करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले; पण जिल्ह्यात दर आठवड्याला ६९६० स्वच्छतागृहांची बांधकामे होत आहेत. याची दखल घेत राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल यांनी पत्र पाठवून धनराज निला आणि जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले आहे.

Web Title: beed news zp swachh bharat abhiyan