महिलांच्या सुरक्षेसाठी बीड पोलिसांचे कवच 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड -  हैदराबादच्या डॉ. प्रियांका रेड्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. पूर्वीची "बडी कॉर्प' योजना अधिक प्रभावी करीत आता अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित वाटत असलेल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी "कवच' या नावाने नवीन उपक्रम बीड पोलिसांनी हाती घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी (ता. दोन) दिली.

कामगार व नोकरदार महिलांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप, प्रत्येक ठाण्यामध्ये स्वतंत्र महिला पोलिस, पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या मुद्द्यावरून महिलांबाबतचा गुन्हा नोंद होण्यास दिरंगाई नसेल, रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत भीती वा असुरक्षित वाटत असल्याचा फोन येताच पोलिसांचे वाहन महिलांपर्यंत पोचून त्यांना घरी सोडणार आहे. या "कवच' उपक्रमाचे आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगार समन्वय अधिकारी असतील. या बाबी या उपक्रमातील वैशिष्ट्य आणि महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असणार आहेत.

यापूर्वी पोलिस दलात महिलांच्या सुरक्षेसाठी "बडी कॉर्प' अस्तित्वात होते. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी नसायची. मात्र, हैदराबाद येथील डॉ. प्रियांका रेड्डी अत्याचार व हत्या प्रकरणानंतर पोलिस दलाने सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, श्री. लगारे यांची उपस्थिती होती. 

असुरक्षित वाटताच करा फोन 
या अभियानांतर्गत जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही भागात एखाद्या महिलेने असुरक्षित असल्याचे पोलिस नियंत्रण कक्षाला (02442-222666, 02442-222333 या क्रमांकावर किंवा 1091 या हेल्पलाइनवर) कळवताच त्या महिलेजवळ जवळच्या पोलिस ठाण्याचे अथवा गस्ती पथकाचे वाहन पोचेल आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवले जाईल, असे श्री. पोद्दार यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यातील महिला "बडी कॉर्प' त्या क्षेत्रातील कामानिमित्त बाहेर जावे लागत असलेल्या महिलांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप बनवणार असून त्याद्वारे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या शोषणाबद्दलही कारवाई केली जाणार आहे. या ग्रुपमध्ये कामगार, कर्मचारी आणि अधिकारी अशा सर्वच घटकांतील महिलांचा समावेश असेल. या महिला आपल्या अडचणी या ग्रुपवर किंवा संबंधित महिला पोलिसांना व्हॉट्‌सऍपद्वारे कळवू शकतील. 


गुन्हा नोंदीसाठी हद्दीचा अडसर नाही 
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा पोलिसांनी तक्रारीला प्रतिसाद देण्यासाठी ठाण्याची हद्द हा नेहमीच कळीचा प्रश्‍न असतो. आता महिला अत्याचारासंदर्भात गुन्ह्यात हद्दीचा प्रश्‍न उरणार नाही. महिला अत्याचारासंदर्भात एखादी तक्रार आल्यास कोणत्याही ठाण्याने अगोदर ती दाखल जरून घ्यायची असून, त्याला तातडीने प्रतिसाद देत महिलेला सुरक्षित वातावरण द्यायचे असून त्यानंतर हद्दीचा विचार करून योग्य ठिकाणी सदर गुन्हा वर्ग करायचा आहे. सर्व पोलिस ठाण्यांना अशा सूचना देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. हैदराबाद येथील घटनेनंतर गुन्हा नोंदीवेळी हद्दीचा मुद्दा पुढे आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com