बीड पालिका निवडणुकीच्या चर्चेला उधाण; शहराला तिसरा पर्याय मिळेल का?

beed
beed

बीड: आगामी काळात नगर पालिकेची निवडणूक असून त्यालाही वर्षभराचा अवधी आहे. मात्र, बीडमध्ये आतापासून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. ही आगामी निवडणुकीची पायाभरणी सुरु झालेली दिसत आहे. क्षीरसागरांना पर्याय असू शकेल का? तिसरा सक्षम पर्याय कोण, असा सवाल या निमित्ताने पडत आहे.

सक्षम पर्यायच नसेल तर बीडची सत्ता काका किंवा पुतण्याकडे जाईल यात शंका नाही. आजमितीपर्यंत तरी दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधकांचे संघटन सक्षम पर्याय देण्याऐवढे ताकदीचे नाही. नगर पालिकांच्या निवडणुकांना तसा साधारण वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. पण, मागच्या आठवड्यात आमदार संदीप क्षीरसागर गटाच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत घेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आघाडी घेतली आहे.

दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधकांनी ‘दोघे एकच’, ‘फोडाफोटी नाटकं’, ‘काकांना नगराध्यक्ष करण्यासाठी पुतण्याची शाळा’ अशा टीका आणि आरोप सुरु केले आहेत. तर, शहरातील विकासाबाबतही घोषणांचा सुकाळ आणि शहर विकासाचा बट्ट्याभोळ असे कायमचे चित्र आहे. मात्र, निवडणुकीत सक्षम पर्यायच नसेल तर टीका आणि आरोपाला महत्व काय, असा साधा प्रश्न आहे.

मागील आकडेवारी पाहिली तर साधारण ३० वर्षांपासून (एक टर्मचा अपवाद सोडला तर) बीड पालिकेवर क्षीरसागरांची सत्ता आहे. २०१२ च्या निवडणुकीत सर्वजण एकत्र आले तेव्हा सर्वांचा ५० पैकी एक सदस्य विजयी झाला. राज्यातील मागच्या सत्तेच्या काळात नगर पालिकेवर एकदा झेंडा फडकविणाऱ्या शिवसेनेला पुन्हा दमदार कामगिरी करता आली नाही. पण, आता माजी मंत्रीच या पक्षात असल्याने मागची दैना फीटणार आहे. मागच्या निवडणुकीत क्षीरसागरांच्या सत्तेला हादरा दिला तोही त्यांच्याच पुतण्याने.

एमआयएमने चमकदार कामगिरी केली असली तरी या पक्षाची भुमिका निवडणुक लागण्याअगोदर पासून संशयाच्याच भोवऱ्यात होती. त्यात पुन्हा फुटाफुटीचा शाप या पक्षाला लागला. आता त्यात काही भरीव होईल, ही अपेक्षा गैर आहे. एमआयएममुळे उपनगराध्यक्षपदही पुन्हा क्षीरसागरांच्याच घरात गेले तेवढी काय, उपलब्धी.

वर्तमानाचा आणि येणाऱ्या निवडणुकांचा विचार केला तर क्षीरसागर विरोधकांची शहरात कमी नाही. मात्र, सर्वांचा एक विचार नाही. ताकदीने क्षीण असल्याने त्यांच्या संघटनालाही मर्यादा आहेत. त्यामुळे केवळ आरोप - टीकांच्या पत्रकांपेक्षा अधिक काही नाही. आता चार नगरसेवक फोडून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दाखवून दिले आहे कि ते निवडणुकीच्या तयारीला लागलेत. संघटनाबरोबरच निवडणुकीच्या वार्डांची रचना, मतदार नोंदणी या निवडणुकीच्या गणितांमध्ये ते माहीर आहेतच.

आता त्यांचे विरोधक संदीप क्षीरसागरही विद्यमान आमदार असल्याने जरी नगरसेवक फुटल्याने आज ते बॅकफूटवर असले तरी त्यांचाही संघटनात हातखंडा आणि निवडणुका लढविण्याचा अनुभव आहेच. मागच्या वेळी संशयाचे मोहळ बसलेले असतानाही करिष्मा करणारी एमआयएमचे आताचे संघटन आणि उद्याची तयारी काय, असा प्रश्न आहे. मागच्या निवडणुकीत स्वतंत्र उतरलेल्या शिवसंग्रामचे संघटनही विस्कळीत आहे. शहरात संपर्क असलेल्यांना पक्षाची ताकद नाही. बीड शहरात भाजपचा भुतकाळच बरा होता म्हणण्याची वेळ आता आहे. केवळ कार्यालयांसमोर २० - ५० लोकांच्या घोळक्यात आंदोलन करणे आणि ५० नगरसेवकांची नगर पालिका लढविणे यात जमिन आसमानचा फरक आज जरी लक्षात आला तरी उद्या किमान एखाद्या पक्षासोबत युती करण्यापुती तरी ताकद निर्माण होईल.

दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधकांनी केवळ त्यांच्यावर टिका केली आणि बीडकरांची त्यांच्याबाबत असलेल्या नाराजीवरच आपला झेंडा फडकेल असे चित्र रंगवत राहून संघटन करायचा विचार सोडून दिला तर राज्यात जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीत असली तरी बीडमध्ये हेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील किंवा दोघांच्याही काही तरी नावांच्या आघाड्या असतील एवढेच का. पण, त्यांच्या विरोधकांची वाटचाल अशीच राहील तर तिसरे कोण, याचाच शोध भविष्यातही घ्यावा लागेल.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com