सोळंकेंचाही मुंडेंनी केला खुबीने वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

बीड - स्वत:च्या नेतृत्वविस्तारात आड येणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस आणि अक्षय मुंदडा यांच्या अंगावर घालण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा खुबीने वापर केला. ऐन निवडणुकीच्या दिवशी मुंडेंची गैरहजेरी, धस, क्षीरसागरांवर अद्याप न झालेली कुठलीही कारवाई आणि पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांविरोधात अद्यापही न झालेले अपील यावरून सर्व बाबींतून प्रकाश सोळंकेंना मुंडेंनी एकटे पाडल्याचे दिसत आहे. 

बीड - स्वत:च्या नेतृत्वविस्तारात आड येणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस आणि अक्षय मुंदडा यांच्या अंगावर घालण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा खुबीने वापर केला. ऐन निवडणुकीच्या दिवशी मुंडेंची गैरहजेरी, धस, क्षीरसागरांवर अद्याप न झालेली कुठलीही कारवाई आणि पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांविरोधात अद्यापही न झालेले अपील यावरून सर्व बाबींतून प्रकाश सोळंकेंना मुंडेंनी एकटे पाडल्याचे दिसत आहे. 

आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात आहेत. ओबीसी नेते म्हणून त्यांना पक्षातही पुढचे स्थान आहे. पण, पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या धनंजय मुंडेंना पक्षाने वक्तृत्वाच्या जोरावर परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. त्यानंतर त्यांनी या पदाचा पक्षविस्ताराऐवजी स्वत:च्या नेतृत्वविस्तारासाठी वापर केला. या माध्यमातून पक्षातील स्पर्धकांना त्यांनी येनकेन मार्गे शह देण्याचे प्रयत्न सुरू केले. बीडमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात पुतण्याला बळ देण्याचा प्रकार असो किंवा अंबाजोगाईत मुंदडा समर्थकांचा पराभव करण्यात हातभार लावण्याबरोबरच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ पुरवण्याचा त्यांचा नित्याचा प्रयत्न असतो. दरम्यान, जिल्हा परिषदेत त्यांचे पाच समर्थक विजयी झाले. पण, काँग्रेससह केज मतदारसंघातील सदस्यांच्या विजयाचे श्रेयही धनंजय मुंडेंनी घेतले. मात्र, त्यांचे पक्षातील स्पर्धक सुरेश धस यांच्या पत्नीचा आणि बीड मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने जयदत्त क्षीरसागरही काहीसे बॅकफूटवर गेले होते. याचा फायदा घेत  अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून दूर ठेवण्यात यश मिळवले. शेवटी याचा पक्षाला फटकाही बसला. दरम्यान, माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे नऊ समर्थक विजयी झाल्याने त्यांच्या पत्नी मंगल सोळंके यांना पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली. पण, धसांच्या भूमिकेसह राष्ट्रवादीला इतर छोट्या पक्षांची मदत न मिळवता आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हुकणार हे निश्‍चित होते. याच संधीचा फायदा मुंडेंनी उचलला. नजरेच्या टप्प्यातील लाल दिवा दुरावल्याने प्रकाश सोळंकेंचा संताप वाढणार हे साहजिकच होते. त्यामुळे ऐन निवडीला दांडी मारून त्यांनी सोळंकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून धस, क्षीरसागर व मुंदडांवर निशाणे साधून घेतले. 

वास्तविक त्या दिवशी विधिमंडळ कामकाजाला सुटीही होती. तसेच ही निवड प्रक्रिया पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. पण स्वत: समोर येण्यापेक्षा त्यांनी सोळंकेंना बोलतं केलं. सोळंकेंनी मुंदडांना या प्रकारात ओढल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले. कारण, क्षीरसागर आणि धस हे मुंडेंचे स्पर्धक आहेत. मुंदडा हे जिल्ह्यात पवारांना सर्वात जवळचे आहेत. स्वत: शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळेंचा मुंदडांकडे अधूनमधून मुक्काम असतो. त्यामुळे मुंदडा समर्थकांनी मतदान करूनही त्यांची कोंडी केली गेली. 

उशिराचा व्हीप अन्‌ अपिलाला नाही मुहूर्त
सुरेश धस हे भाजपला मदत करणार असल्याची चर्चा निवडीच्या पाच दिवस अगोदर सुरू झाली. निवडीच्या तीन दिवस अगोदर तर त्यांनी थेट जाहीरही केले. पण, राष्ट्रवादीच्या सदस्यांना निवडीच्या आदल्या रात्री आठ वाजता ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावण्यात आला. धनंजय मुंडे समर्थक गटनेते असताना मुद्दाम ‘व्हीप’ला झालेल्या उशिराचे कारण तरी आता प्रकाश सोळंकेंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांनी विरोधात मतदान करून पाच दिवस उलटले तरी अद्याप त्यांच्या विरोधात अपात्रतेसाठी अपिलालाही मुहूर्त भेटला नाही. 

Web Title: beed politics