‘झेडपी’ इतिहासात प्रथमच खातेवाटपाची सभा तहकूब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

बीड - भाजपप्रणीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये शिक्षण व आरोग्य सभापतिपदावरून एकमत न झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विषय समिती खातेवाटपाची सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. विषय समिती निवडीसाठीच्या सभेत खातेवाटप न करताच तब्बल तीन तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली. 

बीड - भाजपप्रणीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये शिक्षण व आरोग्य सभापतिपदावरून एकमत न झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विषय समिती खातेवाटपाची सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. विषय समिती निवडीसाठीच्या सभेत खातेवाटप न करताच तब्बल तीन तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली. 

बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर विषय समिती सभापतींना खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १७) स्काऊट भवनच्या सभागृहात बोलाविण्यात आली होती. यात शिक्षण आणि आरोग्य समितीवर शिवसंग्रामच्या नेत्या तथा उपाध्यक्ष जयश्री मस्के आणि काँग्रेसचे सदस्य राजेसाहेब देशमुख या दोघांनीही दावा केला. त्यानुसार सभागृहात शिक्षण आणि आरोग्य समिती सभापतिपदासाठी या दोघांचीही नावे सुचविली गेली. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या तडजोडीनुसार राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण आणि आरोग्य समितीचा शब्द देण्यात आला होता, असा दावा काँग्रेससह भाजपच्या अनेक सदस्यांनी केला. स्वतः आमदार आर. टी. देशमुख, भाजपनेते रमेश आडसकर यांनी शिवसंग्रामची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आमदार आर. टी. देशमुख यांनी थेट आमदार विनायक मेटे यांच्याशीही संपर्क साधला; मात्र जयश्री मस्के यांनी शिक्षण समितीवरचा आपला हक्क सोडण्यास नकार दिला. शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदासाठी एकवेळ मतदान होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली; मात्र तब्बल तीन तास काथ्थ्याकूट केल्यानंतर कुठलाच निर्णय होत नसल्याने अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभाच तहकूब करण्याचा निर्णय घेतला. 

बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच खातेवाटपाची सभा केवळ सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे तहकूब करण्याची वेळ आली. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती निवडीत एकदिलाने असलेल्या महायुतीमध्ये असलेला अंतर्गत गोंधळ यानिमित्ताने पुढे आला असून सत्ताधाऱ्यांची जिल्हा परिषदेची वाट किती अवघड असेल? हेच यातून समोर आले आहे. 

विषय समिती सदस्य निवडीबाबत ‘वेट अँड वॉच’
जिल्हा परिषदेतील दहा विषय समित्यांवर ८३ सदस्यांची निवड करावयाची असून याची रणनीती बैठकीपूर्वीच ठरली होती. त्यानुसार एकूण ८३ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. मात्र, स्थायी व जलसंधारणसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोणाची कोणत्या समितीवर वर्णी लागली? हे स्पष्ट झाले नाही. समितीनिहाय सदस्यांची अधिकृत घोषणा अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सभागृहात केली नाही. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. 

शिक्षण व आरोग्य खात्याला आले महत्व
शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना उपाध्यक्षपद देतेवेळीच शिक्षण व आरोग्य खातेही देण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी पक्षादेश डावलून भाजपला साथ दिली. त्यामुळे त्यांनाही शिक्षण व आरोग्य खाते देण्याचा शब्द श्रेष्ठींनी दिला होता, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. दावे-प्रतिदाव्यांमुळे कधी नव्हे ते शिक्षण व आरोग्य खात्यास मोठे महत्त्व प्राप्त झाले असून कृषी व पशुसंवर्धन खाते घेण्यास कोणीही उत्सुक नसल्याचेच दिसते.

‘झेडपी’त आमदार देशमुख, आडसकरांचे ठाण
सभास्थळी आमदार आर. टी. देशमुख, रमेश आडसकर हे तीन तास तळ ठोकून होते. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांचे मन वळविण्यासाठी देशमुख यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला; परंतु जयश्री मस्के यांनी मात्र शिक्षण व आरोग्य खात्यावरील दावा सोडला नाही. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंडगे, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के हेदेखील ठाण मांडून होते.

पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत
पदाधिकारी निवडीला महिनाही होत नाही तोच जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड झाला आहे. विषय समित्यांचे खातेवाटपही सत्ताधाऱ्यांना करता येऊ नये, ही बाब दुर्दैवी असून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे यांनी दिली.

Web Title: beed zp