राष्ट्रवादीतील शह-काटशहचा आज निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

बीड - जिल्हा परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू झालेले अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणावर आज अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नेत्यांची शनिवारी (ता. चार) मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतही रणनीती ठरणार आहे. 

बीड - जिल्हा परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू झालेले अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणावर आज अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नेत्यांची शनिवारी (ता. चार) मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतही रणनीती ठरणार आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे 60 पैकी एका पुरस्कृतसह सर्वाधिक 26 सदस्य निवडून आले; पण आता अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 26 सदस्यांमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या गटाचे सर्वाधिक नऊ, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश धस यांचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. सर्वाधिक सदस्य असल्याने माजी मंत्री सोळंकेंनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातील काही नेत्यांचा छुपा विरोध आहे. त्यामुळे अनेकांनी एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरे नाव पुढे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीच्या मदतीची गरज आहे. मात्र, आघाडीमुळे पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याचा दावा करीत आमदार जयदत्त क्षीरसागर व जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण यांच्याकडून आघाडीला सोबत घेण्याबाबत विरोध आहे. आघाडीशिवाय सत्ता आणून देण्याचा दावाही त्यांनी केला असून, तसे पर्यायही सुचविले आहेत; पण जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना शह देण्यासाठी आघाडीला सत्तेत घेऊन पद देण्याची खेळी राष्ट्रवादीतल्याच काही नेत्यांकडून सुरू आहे. या शह-काटशहबाबत खासदार शरद पवार काय निर्णय घेतात, हे लवकरच कळणार आहे. दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या बैठकीला श्री. पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाधक्ष सुनील तटकरे या नेत्यांसह जिल्ह्यातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, माजी प्रकाश सोळंके, माजी मंत्री सुरेश धस, नंदकिशोर मुंदडा, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: beed zp ncp politics