ओढाताणीवरून आता राजकीय रुसव्यापर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बीड - शिक्षण व आरोग्य समितीवरून पहिल्या सभेत भाजप व शिवसंग्राममध्ये ओढाताण झाल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. आता बुधवारी (ता. 26) सभा होणार असून ही समिती कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता भाजप व शिवसंग्राममध्ये रुसवा वाढला आहे. 

बीड - शिक्षण व आरोग्य समितीवरून पहिल्या सभेत भाजप व शिवसंग्राममध्ये ओढाताण झाल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. आता बुधवारी (ता. 26) सभा होणार असून ही समिती कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता भाजप व शिवसंग्राममध्ये रुसवा वाढला आहे. 

कमी जागा असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवली. माजी मंत्री सुरेश धस यांनी विनाअट भाजपला मदत केली. सत्तास्थापनेनंतर 17 एप्रिलला समिती वाटपासाठीची पहिली सर्वसाधारण सभा झाली. मात्र, उपाध्यक्षा जयश्री मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख हे दोघेही शिक्षण व आरोग्य समितीसाठी आग्रही राहिले. शिवसंग्रामने या समितीसाठी थेट मतदानाची मागणी केल्याने विषय टोकाला गेला व पहिलीच सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. यावरून भाजप व शिवसंग्रामधील मतभेदही चव्हाट्यावर आले. दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये समित्यांचे वाटप होणार आहे. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शिक्षण व आरोग्य समिती श्रीमती मस्केंना की श्री. देशमुख यांना द्यायची, याबाबत अंतर्गत समेट झालेला नव्हता. त्यामुळे बुधवारी पुन्हा काय आणि समिती कोणाला याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अगोदर मतभेद, आता रुसवा 
मधल्या काळात पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार विनायक मेटे यांच्यात राजकीय मतभेद होते. मात्र, सुरेश धसांनी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत येण्याच्या आशा पल्लवित झाल्या. याच कारणांनी पंकजा मुंडे व श्री. मेटे यांच्यातील मतभेद दूर झाले. सत्तास्थापनेत सहभागी होणारी शिवसेना उपाध्यक्षपदासाठी आग्रही होती. पण, श्री. मेटे राज्यपातळीवर नेतृत्व करत असल्याने त्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद तर सुरवातीपासून उघड भाजपसोबत येणाऱ्या कॉंग्रेसच्या राजेसाहेब देशमुख यांना चांगली समिती देण्याचेही सर्व नेत्यांच्या बैठकीत ठरले. मात्र, नंतर शिक्षण व आरोग्य समितीसाठी जोरदार ओढाताण सुरू झाली आहे. त्यावरून पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याची नामुष्कीही ओढवली. त्यामुळे बुधवारी पुन्हा काय होणार असा पेच असला तरी राजकीय रुसवा सुरू झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आणि शिवसंग्रामचे नेते एकमेकांना बोलायला तयार नसल्याची माहिती आहे. 

Web Title: beed zp politics