रुसव्या-फुगव्यात समित्यांचे बिनविरोध वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

बीड - जिल्हा परिषदेचे रखडलेले समित्यांचे वाटप बुधवारी (ता. २६) झालेल्या सर्वसाधारण सभेत झाले. शिवसेनेचे युद्धाजित पंडित यांना अर्थ व बांधकाम, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण व आरोग्य, तर उपाध्यक्षा जयश्री मस्के यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली; मात्र सभेतच आपणाला कृषी व पशुसंवर्धन समिती नको असे म्हणत श्रीमती मस्के यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

बीड - जिल्हा परिषदेचे रखडलेले समित्यांचे वाटप बुधवारी (ता. २६) झालेल्या सर्वसाधारण सभेत झाले. शिवसेनेचे युद्धाजित पंडित यांना अर्थ व बांधकाम, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण व आरोग्य, तर उपाध्यक्षा जयश्री मस्के यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली; मात्र सभेतच आपणाला कृषी व पशुसंवर्धन समिती नको असे म्हणत श्रीमती मस्के यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

कमी सदस्य असतानाही भाजपने शिवसंग्राम, शिवसेना, काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली. दरम्यान, ता. १७ एप्रिलला समिती वाटपासाठीची पहिली सर्वसाधारण सभा झाली; मात्र उपाध्यक्षा जयश्री मस्के व राजेसाहेब देशमुख या दोघांनीही शिक्षण व आरोग्य समितीवर दावा केल्याने अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सभा तहकूब केली होती.

बुधवारी समित्यांच्या वाटपासाठी अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्षा जयश्री मस्के, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, सभापती युद्धजित पंडित, सभापती राजेसाहेब देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. मागच्या सभेत जयश्री मस्के यांना शिक्षण व आरोग्य समितीच्या मागणीचा ठराव मांडणाऱ्या अशोक लोढा यांनीच या वेळी राजेसाहेब देशमुख यांचे नाव सुचविले. त्यास अध्यक्षा सविता गोल्हार यांनी मान्यता दिली. तर अविनाश मोरे यांनी सभापती युद्धजित पंडित यांना बांधकाम व अर्थ समिती द्यावी, हा ठरावही संमत झाला. त्यामुळे एकमेव शिल्लक राहिलेली कृषी व पशुसंवर्धन समिती आपसुकच उपाध्यक्षा जयश्री मस्के यांच्याकडे आली; पण आपण कृषी व पशुसंवर्धन समितीचा पदभार स्वीकारणार नाही असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

विरोधकांना आयते कोलित
उपाध्यक्षा श्रीमती मस्केंऐवजी राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण - आरोग्य समिती मिळाल्याचे कोलित विरोधकांना मिळाले. उपाध्यक्षा महिला असल्याने त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे, असा सूर आळवून माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे आदी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

मस्केंचा राग; आडसकरांची सबुरी
खातेवाटपावरून ओढाताणीच्या पार्श्‍वभूमीवर राजेंद्र मस्के व भाजप नेते रमेश आडसकरांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. श्री. मस्के म्हणाले, उपाध्यक्षास अर्थ व बांधकाम खाते द्यायचे नाही असे ठरले होते, शिक्षण व आरोग्य खात्याचा विषय चर्चेला आला नव्हता. चार सदस्य असल्याने आम्हाला शिक्षण व आरोग्य खाते मिळावे असा आमचा आग्रह होता; पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षण व आरोग्य समितीसाठी राजेसाहेब देशमुख यांना शब्द दिला आहे असे आमदार विनायक मेटेंना सांगितले. त्यामुळे या समितीवरील दावा मागे घेतला. त्यामुळे खात्याविना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले; पण पंकजा मुंडे म्हणाल्या तर आपण समिती स्वीकारू असे सांगत ज्यांना जनतेने नाकारले, ज्यांचा दोन ठिकाणी पराभव झाला ते नातेवाईकांच्या आडून लुडबूड करीत असल्याचा टोला त्यांनी रमेश आडसकर यांचे नाव न घेता लगावला. यावर आडसकर म्हणाले, युतीकडे सर्वांना सोबत घेऊन सत्ता आणून एकत्र काम करण्याचे ठरलेले आहे. प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जो कोणी उपाध्यक्षपद घेईल त्याला कृषी व पशुसंवर्धन खाते द्यायचे प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ठरले होते. पंकजा मुंडे, विनायक मेटे, सुरेश धस, बदामराव पंडित व आपण त्या बैठकीत होतो. राजेंद्र मस्के नव्हते. रागात मस्के बोलले असले तरी ते आपले मित्र आहेत. श्री. देशमुख नातेवाईक असले तरी पंकजा मुंडेंनी खासदार रजनी पाटलांना शब्द दिला होता. सत्तेची गाडी स्टार्ट करून देण्यापुरते आपले काम होते. उद्यापासून दुसरी राजकीय जबाबदारी असेल, असे आडसकर यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी राम यांना निरोप
या सभेत माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. जिल्ह परिषद ग्रामीण विकासाची महत्त्वाची संस्था असून सभागृहात विकासावर चर्चा व्हावी, धोरणात्मक निर्णय व्हावेत, असे नवल किशोर राम म्हणाले. सीईओ नामदेव ननावरे यांनी निवृत्ती जवळ येऊन ठेपलेली असताना कामात तडफ दाखविल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Web Title: beed zp politics