औंढा नागनाथ यात्रा महोत्‍सवास सुरवात

aundha nagnath
aundha nagnath

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : आठवे ज्‍योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रा महोत्‍सवाला सुरवात झाली असून शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. दरम्यान, महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिरामधील कासव गाभारा, मंदिरामधील श्री नागनाथ देवाच्या पिंडीसह सर्व मंदिरांत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र महोत्‍सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्‍यानिमित्त गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची महापूजा होणार आहे. त्‍यांनतर दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार आहे. दर्शन रांगेतील प्रथम भक्तास महापूजेला बसण्याचा मान संस्थानकडून देण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. ही पालखी परंपरेनुसार रावळेश्वर मामा यांच्या दर्शनासाठी जाणार आहे.

मंगळवारी रथोत्सवाचा कार्यक्रम

 मंगळवारी (ता. २५) रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी श्रींची आकर्षक मूर्ती सजवून रथामध्ये ठेवली जाणार आहे. त्यानंतर मंदिरास पाच प्रदक्षिणा घातल्‍या जाणार आहेत. दिवशी दुपारी दोन वाजता महाप्रसाद वाटपास सुरवात होणार आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता अच्युत महाराज दस्‍तापूरकर यांच्या काल्‍याच्‍या कीर्तनाने उत्‍सवाची सांगता होणार आहे.
तसेच महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्‍सवासदेखील सुरवात झाली असून आकाशपाळणे, बच्चे कंपनीसाठी खेळांचे विविध साहित्य उपलब्ध झाले आहेत. यासह विविध स्‍टॉलची उभारणीदेखील करण्यात आली आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त राहणार

पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक, एक उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक दोन, बीडीडीएस पथक, प्लाटून पथक, एटीस पथक, एलसीबी पथक व ट्राफिक पोलिसांचे पथक बंदोबस्त ठेवणार आहेत. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बालाजी काळे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी बंदोबस्‍त ठेवला आहे.

डोंगरकडा येथे यात्रा महोत्‍सव

डोंगरकडा : येथील जटाशंकर महादेव मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्‍सवानिमित्त मंगळवारपासून (ता.१८) विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. येथील मंदिर पुरातन असून एकमुखी शिवलिंग असलेले हे देवस्‍थान आहे. यात्रेनिमित्त भजन, कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच कुस्‍ती स्‍पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवारी (ता.२१) पहाटे तीन वाजता महाअभिषेक, पूजा होणार आहे. सकाळी दहा वाजता कृषी व पशू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.२५) दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी रथाची मिरवणूक निघणार आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक व त्‍यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

पोतरा येथे विविध कार्यक्रम

पोतरा : येथील पवित्रेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक, पूजा व आरती होणार आहे. त्‍यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. मंदिरात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले जाणार आहे. दिवसभर दर्शनाचा कार्यक्रम, त्‍यानंतर सायंकाळी साबुदाण्याची खिचडी तसेच चहाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी आठ वाजता नागोराव पांडे पोतरेकर यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी (ता.२२) सकाळी माजी आमदार गजानन घुगे व चंद्रकांतअप्पा बेंबळगे यांच्या तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

जलेश्वर, माणकेश्वर मंदिरात कार्यक्रम

हिंगोली : शहरातील तलाबकट्टा भागात असलेल्या जलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, आरतीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता. २२) सकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तसेच वसमत तालुक्‍यातील कौठा येथील माणकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय हयातनगर येथील चलमेश्वर महादेव मंदिर, सिद्धेश्वर मंदिर व जुने महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com