सातवीच्या मुलात जागृत झाली "मानवता जात' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

बीड -  राजकारण, समाजकारण आणि काहींच्या वैयक्तिक जीवनातही जात आणि धर्म हा अविभाज्य घटक झाला. अनेकदा जातींच्या मोर्चांनीही समाजजीवन ढवळून जाते; पण एका सातवीच्या मुलाने शाळेतील हजेरी पुस्तिकेवरील रकान्यातील स्वत:च्या नावासमोरील जात आणि धर्माचा उल्लेख पेनाने खोडून टाकला आहे. मानव ही एकच जात असल्याचे तो सांगतो. वय अल्लड असले तरी एका खेड्यातील विद्यार्थ्याने आपल्या कृतीतून फार मोठा संदेश दिला आहे. 

जिल्हा परिषदेच्या जोगेश्वरी पारगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील शाळेत रोहन सुरेश भोसले (वय 12) हा सातवीत शिकतो. अठरा विद्यार्थ्यांच्या या तुकडीत हजेरीपटावर रोहनचे तेराव्या क्रमांकावर नाव आहे. वर्गशिक्षक सोमनाथ वाळके सोमवारी (ता. दोन) हजेरी घेऊ लागले तेव्हा रोहनच्या नावापुढील दोन रकाने (जात आणि धर्म) पेनाने खोडल्याचे आढळले. काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला असावा, असे समजून वाळके यांनी "हजेरी कोणी घेतली होती रे' असा चढ्या आवाजात प्रश्‍न केला. यावर काहीसा कावराबावरा झालेला रोहनच पुढे सरसावला आणि घाबऱ्या स्वरात पण खंबीरपणे उत्तरला- "होय सर, मीच खोडला जात आणि धर्माचा उल्लेख'. 

"तू हे का केलेस' या वाळके गुरुजींच्या प्रश्नावर, "पृथ्वीवर केवळ मानव हीच जात आणि धर्म आहे, प्रत्येकाने एकमेकांशी माणुसकीच्या नात्याने वागावे, जगात समानता आणली पाहिजे, स्वतःच्या मनातून जात काढून टाकली पाहिजे, असे शिकविताना तुम्हीच सांगता. मग हजेरीपटावर आमची जात आणि धर्म का लिहिलेला असतो? माझ्या नावापुढील जात व धर्माचा उल्लेख मीच खोडला, असे रोहनने सांगून टाकले. 

दरम्यान, रोहन हा शिक्षणात हुशार आहे. शिक्षकांतर्फे अध्यापनादरम्यान किंवा बोलण्यातून समानता, मानवता आदी बाबींचा नित्य उल्लेख होतो. याच प्रभावातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असे वर्गशिक्षक वाळके यांनी सांगितले. केवळ जातीवर बोलणाऱ्यांसाठी रोहन या अल्लड विद्यार्थ्याची कृती म्हणजे एक धडाच असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Being aware of humanity was the seventh child