नांदेडच्या शाळांतही वाजणार ‘ही’ बेल 

file photo
file photo

नांदेड :  देशातील अनेक शाळा आपल्या आगळ्या वेगळ्या उत्कृष्ट उपक्रमाने ओळखल्या जातात. यातील काही शाळा व महाविद्यालय, इतर शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात. अशातच विद्यार्थ्याना पाणी प्यायला लावण्याच्या ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविणाऱ्या शाळांची भर पडली आहे.

भारतात सर्वाधिक साक्षरता असलेल्या केरळ राज्यातील शाळांमध्ये आगळ्या वेगळ्या पण उपयुक्त ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची सूचना) चा उपक्रम राबविल्या जात आहे. शाळकरी मुला- मुलींमध्ये यूरीनरी ट्रॅक इन्फेक्शनचं प्रमाण वाढत असल्याचे बालरोग तज्ज्ञांकडून केरळ सरकारला कळविण्यात आले. तेव्हा आरोग्याच्या या समस्येवर उपाय म्हणून ‘पाण्याची घंटा’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम असोसिएशन फॉर प्रायमरी एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेनं हाती घेतली असून सर्वच ठिकाणी राबविण्याचा त्यांचा हेतू आहे. 

 ब्रेक १५ ते २० मिनिटांचा

विद्यार्थी मुला- मुलींच्या हिताचा हा उपक्रम लोकप्रीय झाला असून केरळ पाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू व तेलंगणा राज्यातील शासकीय शाळांमध्ये ही ‘वॉटर बेल’ संकल्पना राबविल्या जात आहे. ‘वॉटर बेल’ ला विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्याचा ‘वॉटर ब्रेक’ पण म्हटल्या जाते. हा ब्रेक १५ ते २० मिनिटांचा असतो.
मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) हे अनेक आजाराचे प्रमुख कारण आहे. शरीराला आवश्यक तेवढे पाणी न पिल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. मुले त्यातही प्रामुख्याने मुलींनी कमी पाणी पिण्याची अनेक कारणे आहेत.

मुली/ महिला आवश्यक तेवढे पाणी पीत नाहीत

एका सर्व्हेनुसार शाळेत स्वच्छ पाण्याची उपलब्धता नसल्याने तसेच स्वच्छ शौचालयांची कमतरता असल्याने प्रामुख्याने मुली/ महिला आवश्यक तेवढे पाणी पीत नाहीत. तसेच ७२ टक्के मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांना वर्गात पाणी पिण्यास मनाई आहे. म्हणून ते पाणी पीत नाही. तर ७९ टक्के शिक्षक कबूल करतात की, ते वर्गात विद्यार्थ्याना पाणी पिऊ देत नाहीत. कारण विद्यार्थी वारंवार लघुशंकेसाठी परवानगी मागतात.

मुलांनी किमान दीड ते तीन लीटर पाणी प्यावे

विशेष म्हणजे देशातील सुमारे ४० हजार सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उपलब्ध नाहीत. त्यात आसामच्या ११ हजार ८३९, बिहारच्या आठ हजार ३६१, मध्यप्रदेशच्या चार हजार ९१४ आणि महाराष्ट्राच्या एक हजार ६३ शाळांचाही समावेश आहे. मुलांनी किमान दीड ते तीन लीटर पाणी प्यावयास हवे. (हे प्रमाण वय, उंची आणि वजननुसार बदलते.)
 
सर्व्हेनुसार ६८ टक्के पालकांची तक्रार 

सर्व्हेनुसार ६८ टक्के पालकांची तक्रार आहे की, घरुन भरुन नेलेली पाण्याची बाटली, मुलं घरी परत आणतात. पाणी कमी पिल्यामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन होणे, थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा (किडनी स्टोन) होणे, चिडचिडपणा वाढणे, आदी त्रास होण्याची शक्यता असते.  विद्यार्थ्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सर्वप्रथम केरळ राज्यात आणि त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू व तेलंगणा राज्यात ‘वॉटर बेल’ उपक्रम तेथील राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. 

शौचालयांची स्वच्छता राखावी

शाळा, महाविद्यालयातील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरुन जातात. तेव्हा पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी घंटा वाजविण्याचा प्रकार स्तुत्य आहे. शाळेत तीन वेळा अनुक्रमे प्रथम १०. ३५, दुसरी १२ वाजता तर तिसरी घंटा दुपारी दोन वाजता वाजविल्या जाते. यावेळी वॉटर ब्रेक १५ ते २० मिनिटांचा असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तहान असेल तेवढेच पाणी पितात. तद्नंतर शौचालयाकडे जाता येते. विशेष म्हणजे सदर वॉटर बेलपूर्वी शाळेच्या व्यवस्थापनाने काळजीपूर्वक शौचालयांची स्वच्छता करून घेणे आवश्यक असते. 
स्वच्छता व इतर सुविधा व्यवस्थित असल्याने तसेच वेळ राखीव असल्याने विद्यार्थी या उपक्रमास व्यवस्थित प्रतिसाद देतात आणि तहान असेल तेवढेच पाणी पितात, त्यांची पाणी पिण्याविषयीची मानसिकता या वॉटर बेलमुळे तयार होते, पुढे ती सवय होते, हे विशेष.

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

वास्तविक तीन- चार राज्यातील सरकारी शाळेतील ‘वॉटर बेल’ ही संकल्पना संपूर्ण भारतातील सरकारी व खासगी शाळांमध्ये राबविण्याची गरज बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
तेव्हा कोणतेही नुकसान नसलेला हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविल्यास मुले अनेक आजारांपासून दूर राहतील. यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळा व महाविद्यालयीन व्यवस्थापनाने करावी, असे आवाहन या पत्रकात ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com