Beed : भैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed

Beed : भैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहात

परंडा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दैवत असलेल्या श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचा-तालुक्यातील श्रीक्षेत्र कंडारी येथील मंदिरात श्रीकाळ भैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा बुधवारी रोजी रात्री १२ वाजता मोठ्या उत्साहात गुलाल पुष्प उधळून साजरा करण्यात आला यावेळी ‘भैरवनाथाच चांगभल’ भैरवनाथांच्या रथाचे चांगभलंचा जयघोष करीत हजारो भाविक भक्तांनी दर्शनसाठी मोठी गर्दी केली होती.

श्रीक्षेत्र सोनारी येथील मंदिर श्रीकाळ भैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध रंगाच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले होते. या जन्मोत्सवास महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी भागातून भाविकभक्त सोनारीत दाखल झाले होते. बुधवारी कार्तिक वद्य अष्टमी दिवशी सकाळी १०.३० वाजता हभप डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सायंकाळी ६.३० वाजता हभप अपर्णा सहस्रबुद्धे यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला तर रात्री ९ ते ११.४५ हभप राधाताई सानप यांची कीर्तन सेवा झाली.

त्यानंतर मयूर पुजारी यांनी उपस्थित भाविकांना श्रीकाळ भैरवनाथाचे माहात्म्य सांगितले व रात्री १२ वाजता गुलाल पुष्पांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. त्यानंतर मानकरी महिलांनी श्री चा पाळणा गायला व आरती नंतर पंचखाद्य प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी महिलांच्या ओटीत फुलांनी सजवलेल्या पाळण्यातील  भैरवनाथ ओटीत घालण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज ॲड.

विवेक काळे,समीर पुजारी आदींसह गावातील मानकरी तसेच सेवेकरी महिला भाविक भक्त, ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्तिक वद्य नवमी गुरुवारी रोजी श्रीकाळ भैरवनाथांस पुजारी संजय महाराज यांच्या हस्ते ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक घालण्यात आला तर दुपारी १२. ३० वाजता महानैवेद्य, आरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व सेवेकरी यांना बिदागी वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

टॅग्स :Beed