कोरोनाविरुद्ध लढा : भाईश्री फाउंडेशनने दिले ११ लाख रुपये

Bhaishree Foundation Commits RS Eleven Lakhs to Fight Corona
Bhaishree Foundation Commits RS Eleven Lakhs to Fight Corona

जालना - शहरात चहापत्तीचा उद्योग सुरू करून विक्रम चहा घरोघरी पोचविणारे प्रसिद्ध उद्योजक भाईश्री पटेल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा लाखांची मदत केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे त्यांनी रविवारी (ता. ३०) मदतीचा धनादेश सुपूर्द केला. 

राज्यात पसरलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सरकार अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहे. राज्य शासनाने कोरोनाविरोधात लढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला उद्योजक भाईश्री पटेल यांनी भाईश्री फाउंडेशनच्या माध्यमातून ११ लाख रुपयांची मदत केली आहे. 

भाईश्री फाउंडेशन नेहमी समाजकार्यात योगदान देत आलेले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी व गरीब कुटुंबांतील मुलींचे लग्न व दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण यासह अन्य सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातात. या मदतीबरोबरच फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील विविध गावांत निर्जंतुकीकरण कारणासाठी मदत, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य व पोलिस कर्मचाऱ्यांना चहा व बिस्किटाचे रोज वाटप करण्यात येत आहे. 

कोरोनापासून असा करा बचाव 

  • घरी राहा. घरी आलेल्या अभ्यागतांना भेटणे टाळा. जर भेटणे आवश्यक असल्यास, किमान एक मीटर अंतर राखून भेटावे. 
  • आपले हात आणि चेहरा साबणाने आणि पाण्याने धुवावा. 
  • खोकताना आपल्या हाताच्या कोपऱ्याचा किंवा टिश्‍यू पेपर/रुमाल यांचा वापर करा. 
  • खोकला किंवा शिंकल्यानंतर टिश्यू पेपरची विल्हेवाट लावावी. हातरुमाल धुवून घ्या. 
  • योग्य पोषण आहारासाठी घरी शिजवलेले ताजे गरम जेवण करावे. सतत पाणी प्यावे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस घ्यावा. 
  • व्यायाम आणि ध्यान करावे. 
  • डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे नियमितपणे घ्यावीत. 
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांशी (तुमच्याबरोबर राहत नसलेल्या), नातेवाईक आणि मित्रांशी कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावे. आवश्यक असल्यास कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी. 
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा गुडघा बदलण्यासारख्या आपल्या शस्त्रक्रिया करणे (नियोजित असल्यास) पुढे ढकलावे. 
  • आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ जवळच्या आरोग्य सेवा सुविधेशी संपर्क साधावा आणि वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरण करावे. 
  • आपल्या उघड्या हातात किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकू किंवा शिंकू नका. 
  • जर आपल्याला ताप आणि खोकला येत असेल तर आपल्या संपर्कातील लोकांजवळ जाऊ नका. 
  • आपले डोळे, चेहरा, नाक आणि जिभेला स्पर्श करू नका. 
  • स्वत:च्या मनाने औषधोपचार करू नका. 
  • आपल्या मित्रांना आणि जवळच्या लोकांसोबत हस्तांदोलन करू नका अथवा आलिंगन देऊ नका. 
  • नियमित तपासणीसाठी किंवा पुनर्तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जाऊ नका. शक्यतो आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मार्गदर्शन घ्या. 
  • उद्याने, बाजारपेठ आणि धार्मिक स्थळांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 
  • अत्यंत आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com