Bharat Bandh : ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

औरंगाबाद - बंददरम्यान काँग्रेस सेवादलाच्यावतीने एपीआय कॉर्नर येथे महागाईच्या निषेधार्थ रेड्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली.
औरंगाबाद - बंददरम्यान काँग्रेस सेवादलाच्यावतीने एपीआय कॉर्नर येथे महागाईच्या निषेधार्थ रेड्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली.

औरंगाबाद - पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, या मुद्यावरून काँग्रेसतर्फे भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तथापि, काँग्रेसच्या वतीने शहरात ७५ टक्‍के बंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

शहरातील सर्व पेट्रोलपंपांसह काही भागांतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्ष संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई आणि कवाडे गटांनी पाठिंबा दर्शवून सक्रिय सहभाग नोंदविला. बीड बायपास रोडवरील झाल्टा फाटा या ठिकाणी ‘रास्ता रोको’च्या वेळी काँग्रेसच्या प्रवक्‍त्यांसह काहींना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

बैलगाडीत आंदोलन 
बंदचा भाग म्हणून महागाईच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात शहरातील विविध पेट्रोलपंपांसमोर आंदोलन करण्यात आले. मुकुंदवाडी येथील पेट्रोलपंपावर बैलगाडीवर ‘कहां गए अच्छे दिन’, ‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल’, ‘इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी पेट्रोलपंपासमोरचा परिसर दणाणून गेला. मुकुंदवाडी पेट्रोलपंपासमोर प्रदेश प्रवक्‍ते श्री. सावंत, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वात धरणे देऊन घोषणाबाजी करण्यात आली. 

इंधनाची भाववाढ झाल्याच्या निषेधार्थ बैलगाडीत उभे राहून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, बाळूलाल गुजर सहभागी झाले होते.

पंपचालकांचा तीन तास बंद 
बंदच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी तीन तास कडकडीत बंद ठेवल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील २५० पेट्रोलपंप सकाळी नऊ ते दुपारी साडेबारादरम्यान बंद होते. पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे रविवारी (ता. नऊ) रात्री तीन तास बंद पाळण्याचा निर्णय घेतला; मात्र या बंदमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर परिणाम होणार नसल्याचे असोसिएशनचे कोषाध्यक्ष हितेन पटेल आणि सचिव अकिल अब्बास यांनी सांगितले.

सेवादलाचे रेड्यापुढे आंदोलन 
एपीआय कॉर्नर येथील पेट्रोलपंपासमोर काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करत चक्‍क निदर्शनासाठी रेडा आणून उभा केला होता. रेडाही मख्खपणे तिथे उभा होता आणि त्याच्या भोवताली काँग्रेस सेवादलाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. क्रांती चौक, बाबा पेट्रोलपंप चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. स्टेशन रोड व बीड बायपासवरील झाल्टा फाटा या ठिकाणीही काँग्रेसतर्फे रास्ता रोको करण्यात आले. 

‘सोनू, तुझा मोदींवर भरोसा नाय काय...’
बंददरम्यान काँग्रेसतर्फे शहरात विविध बारा ठिकाणी आंदोलने करण्यात आली. निदर्शने, धरणे, रास्ता रोकोच्या वेळी ‘सोनू, तुझा मोदींवर भरोसा नाय काय? मोदींच्या भाषणात असतो जुमला जुमला, पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला वाढला, जनतेचा खिसा आता फाटला फाटला, खिशाचे भगदाड कसे खोल खोल, मोदी सरकार जनतेशी खरं बोल...’ हे गाणे जागोजागी गायिले जात होते. 

जनता सरकारची वाट लावेल 
डॉ. कल्याण काळे म्हणाले, या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने आठवून पाहा. त्यावेळच्यापेक्षा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट, तिप्पट झाले आहेत. यामुळे आता जनता मोदी सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, असे ठणकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com