ऑगस्टमध्ये भय्यू महाराजांचा शहरात येण्याचा क्षण राहूनच गेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - राष्ट्रसंत भय्यू महाराज हे सतत समाजासाठी काही तरी करायचे हा ध्यास घेतलेले थोर व्यक्‍तिमत्त्व होते. येत्या चार ऑगस्ट रोजी तीन हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना तीनचाकी सायकल वाटपाचा कार्यक्रम शहरात घेण्यात येणार होता. याशिवाय समाजातील ज्या अनाथ मुलांना वडिलांचे नाव नाही त्यांना भय्यू महाराज आपले नाव देणार होते. शिवाय हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्स देण्याचा कार्यक्रमदेखील त्यांच्या हस्ते घेण्यात येणार होता. मात्र, त्यांच्या इथे येण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकायला मिळाली, अशी भावना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्‍त केली.

श्री. दानवे म्हणाले, की पंधरा वर्षांपूर्वी कर्णपुरा देवीच्या दर्शनाशाठी भय्यू महाराज आले तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. अधूनमधून सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणे व्हायचे; पण ते मर्यादित होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी सात-आठ वर्षांपासून शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली त्यानंतर महाराजांच्या भेटीचा अनेकदा योग आला. शांत स्वभाव, चेहऱ्यावर तेज आणि समाजाप्रती त्यांना असलेली आपुलकी पाहता भय्यू महाराज अशी टोकाची भूमिका घेतील यावर विश्‍वासच बसत नाही. कोपर्डीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ज्या मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आली तिची आई निःशब्द होती. तेव्हा भय्यू महाराज तिला भेटायला गेले. त्या माउलीला विश्‍वासात घेतले आणि ती बोलायला लागली. कोपर्डीतील घटनेनंतर तिथल्या मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी महाराजांनी दोन बस दिल्या होत्या. त्या कोपर्डीत नेण्याची जबाबदारी माझ्यावरच होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

दु:खी, पीडितांचे मार्गदर्शक - प्रदीप जैस्वाल 
पहिल्याच भेटीत त्यांचा इतका प्रभाव पडला, की मी भय्यू महाराजांना गुरू मानले. गेल्या तेरा वर्षांपासून आमचे गुरु-शिष्याचे नाते. सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून त्यांनी जलसंधारणाची अनेक कामे पूर्णत्वास नेली. गरिबांना घर आणि पिण्यासाठी पाणी देणारे, समाजातील लाखो दु:खी, पीडितांना मार्गदर्शन करणारे भय्यू महाराज स्वत:चे अशा पद्धतीने जीवन संपवू शकत नाहीत, ही अविश्‍वसनीय घटना असल्याची भावना शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी व्यक्‍त केली.  

भय्यू महाराज मला भावासारखे - अकिल अब्बास 
भय्यू महाराजांशी माझा संवाद बावीस वर्षांचा. त्यांचे बंधू नितीन देशमुख यांनी माझी पहिली भेट घालून दिली होती. इंदोर येथील आश्रमात मी बऱ्याचदा गेलो आहे. औरंगाबादला आले, की आमच्या घरी ते भेट द्यायचेच. माझ्या आईला ते अम्मीजान म्हणायचे. कौटुंबिक संबंध असल्यामुळे ते मला माझ्या भावासारखेच होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मला प्रचंड धक्का बसला आहे. समाज, गोरगरीब आणि दीनदुबळ्यांसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती अशी टोकाची भूमिका घेऊन आपले जीवन संपवू शकते, यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाही.

Web Title: Bhayyu maharaj aurangabad