‘भेल’ हवा;‘तेल’ नको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेला टेंबी (ता. औसा) येथील ‘भारत हेवी इलेक्‍ट्रिक लि.’ (भेल) चा ऊर्जा प्रकल्प गुंडाळून दुसरीकडे घेऊन जात त्या जागेवर रामदेवबाबांच्या पतंजली ग्रुपचा सोयाबीन तेल कारखाना उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

औसा - माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेला टेंबी (ता. औसा) येथील ‘भारत हेवी इलेक्‍ट्रिक लि.’ (भेल) चा ऊर्जा प्रकल्प गुंडाळून दुसरीकडे घेऊन जात त्या जागेवर रामदेवबाबांच्या पतंजली ग्रुपचा सोयाबीन तेल कारखाना उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

‘भेल’च्या माध्यमातूनच या भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगाने तालुक्‍याच्या विकासाला काहीच फरक पडणार नाही. या जागेवर ‘भेल’ऐवजी सरकार तेलप्रक्रिया उद्योग उभा करत असेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा विद्या पाटील यांनी दिला.

येथे गुरुवारी (ता.४) पत्रकार परिषदेत पाटील म्हणाल्या, ‘सरकारने टेंबी येथील १८० हेक्‍टर जमीन ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केली होती. या जमिनीवर ‘भेल’चा ऊर्जा प्रकल्प उभा राहणार होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून चार हजार अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. शिवाय, तीन हजार लोकांना आस्थापनेत काम करण्याची तर तीन हजार लोक रोजंदारी कामगार म्हणून संधी मिळणार होती. 

प्रकल्पामुळे लातूर जिल्हा विजेच्या भारनियमनातून मुक्त होणार होता. हा प्रकल्प सुरू होणे तालुक्‍यासाठी महत्त्वाचे असल्याने या जागेवर सरकार रामदेवबाबांचा तेल प्रकल्प उभा करीत असेल, तर त्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात येईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhel Power Project Soybean Oil Factory Vidya Patil