भोंदूबाबाची जादूटोण्याची दुकानदारी बंद

Vijay-Bhoge
Vijay-Bhoge

औरंगाबाद - पुरोगामी महाराष्ट्रात एकीकडे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न होतानाच समाजातीलच काही भोंदू मात्र अंधश्रद्धेला चालना देत असल्याची बाब गंगापूर तालुक्‍यातील नवीन कायगावात समोर आली. दुर्धर आजार, निकामी किडनी बरी करण्याचा अजब दावा  करीत लहान मुलगा व महिलांवर भोंदूबाबा अघोरी उपचार करीत असल्याचे उघडकीस आले आहे.  
कायगाव येथील एका शेतवस्तीवर लोकांच्या असहायतेचा फायदा घेत जादूटोणा आणि मंत्र तंत्राद्वारे उपचार करण्याचे, असाध्य रोग बरा करण्याचे प्रकार सुरू होते. बत्तीसवर्षीय विजय आप्पासाहेब भोगे या व्यक्तीने स्वतःच्या शेतवस्तीवरच बुवाबाजीचे दुकान थाटले. पंचक्रोशीत नागरिकांना लुबाडण्याचा ‘उद्योग’ तो करीत होता. दहा-बारावर्षीय मुलगा किडनी विकाराने त्रस्त आहे. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. 

जीवनमरणाच्या दारात तो उभा आहे. जगण्याची शाश्वतीही डॉक्‍टर देत नसताना या बाबाची ‘कु’कीर्ती ऐकून हतबल पालक शेतवस्तीवर आले. त्यावेळी या बाबाने मुलगा ठीक करतो, दोन्ही किडन्या बऱ्या होतील, असा पोकळ दावा केला. बालकावर अघोरी उपचार सुरू केले. बालवयातील या मुलावर अघोरी संस्कार करण्याचाच हा प्रकार असून, यासोबतच निःसंतान तसेच घरगुती समस्यांग्रस्त महिलांवर अघोरी कृत्य केल्याची बाब व्हिडिओतून समोर आली. 

अंनिसने केली होती तक्रार 
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शेतवस्तीवर जाऊन बाबांचे स्टिंग ऑपरेशन केले. यात अंधश्रद्धाळू लोकांकडून बाबा पैसे उकळत असल्याचे समोर आले. याबाबत २३ जूनला राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. श्‍याम महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल बडवे, जिल्हा प्रधान सचिव सुनील उबाळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह सुनील चोतमल व युवा कार्यवाह रंगनाथ खरात यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रारीसह निवेदन दिले होते.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भाबड्या लोकांकडून मनमानीपणे पैसे घेत होता. दोनशे रुपयांपर्यंतच्या शुल्कासाठी तो साधी पावती देत होता. त्यापेक्षा अधिकची रकम तो वहीत नोंदवीत होता. गंगापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून, ही कारवाई निरीक्षक एम.टी. सुरवसे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, जमादार गणेश काथार, हरीश सोनवणे, श्रीमंत वाघमारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com