काँग्रेसमधील अनेकांनी भूषविले सभापतिपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

भूम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीनंतर तालुक्‍यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने सभापती, उपसभापतिपद भूषविले आहे. गेल्या वेळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे काकासाहेब चव्हाण हे उपसभापती होते, तर सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतिपद शिवसेनेचे दत्ता मोहिते भूषवीत आहेत.

भूम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीनंतर तालुक्‍यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने सभापती, उपसभापतिपद भूषविले आहे. गेल्या वेळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे काकासाहेब चव्हाण हे उपसभापती होते, तर सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतिपद शिवसेनेचे दत्ता मोहिते भूषवीत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना १९६२ मध्ये झाली. पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे (कै.) रावसाहेब खोसे, (कै.) तुकाराम पवार, (कै.) काशीनाथ परंडकर यांनी सभापतिपद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर केवळ काँग्रेसच्या इंदुमती नागरगोजे यांनी काही काळ सभापतिपद भूषवले. मात्र हा काळ वगळाता आमदार राहुल मोटे सांगतील तोच राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला. इंदुमती नागरगोजे यांच्या काळातच काँग्रेस व शिवसेना एकत्र आल्याने ईटचे काकासाहेब चव्हाण यांना उपसभापतिपद अडीच वर्षे मिळाले. जिल्हा परिषदेतही काँग्रेस-शिवसेना युती असल्याने वालवड येथील दत्ता मोहिते हे सध्या बांधकाम सभापती म्हणून काम पाहत आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युती तुटल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण असून, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता पंचायत समितीमध्ये आणू असा विश्‍वास पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले जय हनुमान ग्रुपचे संस्थापक तथा प्रभारी तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वालवडचे रहिवासी तथा काही काळ उपसभापती म्हणून राहिलेले श्री. देवळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पखरूडचे दत्तात्रेय गायकवाड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मातब्बर  उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळालेले बंडखोरी करण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना व भाजप नेते गळ टाकून असून, कोणता प्रमुख कार्यकर्ता आपल्याकडे येईल, यासाठी वेट ॲन्ड वॉचच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्‍यात सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात असून, मजूर सहकारी संस्था, पाणी वाटप संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दूध व्यावसायिक संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

शिवाजी खरेदी-विक्री संघ व बाजार समितीवर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या मर्जीतील लोकांचीच वर्णी लावल्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असणारे कार्यकर्ते दुखावले आहे. काहींनी तर सग्यासोयऱ्यांच्या राजकारणात स्वतःहून निवृत्ती घेतली आहे. 

तालुक्‍यात भाजपचे प्राबल्य नाही तर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच उरल्याने काँग्रेसही म्हणावा तसा प्रभाव या निवडणुकीत पाडणार नाही. किमान राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाल्यास निश्‍चितपणे काँग्रेसला पंचायत समिती व जिल्हा परिषद गटाच्या काही जागा मिळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख कोण होते, यावरही शिवसेनेचे यश अवलंबून असून, चिंचोलीचे सरपंच महादेव वारे का नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले सुरेश कांबळे किंवा अन्य कोणी तालुकाप्रमुख होईल, यावर सध्या शिवसेना कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

Web Title: bhoom congress activists