बिडकीनच्या भूसंपादनाचा पंधरवड्यात निपटारा

आदित्य वाघमारे
रविवार, 27 मे 2018

औरंगाबाद - डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’ प्रकल्पात असलेल्या भूमी अधिग्रहणातील अडचणींचा निपटारा येत्या पंधरा दिवसांत  केला  जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ‘सकाळ’ला दिली. शुक्रवारी त्यांनी शेंद्रा येथे या प्रकल्पाचा तब्बल साडेतीन तास आढावा घेतला. 

औरंगाबाद - डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’ प्रकल्पात असलेल्या भूमी अधिग्रहणातील अडचणींचा निपटारा येत्या पंधरा दिवसांत  केला  जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ‘सकाळ’ला दिली. शुक्रवारी त्यांनी शेंद्रा येथे या प्रकल्पाचा तब्बल साडेतीन तास आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याच्या दोन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीएमआयसीच्या बिडकीन नोडचे भूमिपूजन केले होते. या वेळी चर्चेत आलेल्या मुद्‌द्‌यांच्या निपटाऱ्यासाठी आणि या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी श्री. चौधरी यांनी शेंद्रा येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सकाळी साडेआठला शेंद्रा येथे आल्यावर त्यांनी या औद्योगिक शहराच्या कारभारासाठी तयार करण्यात येत असलेली ‘ऑरिक हॉल’ इमारत, रेल्वे ओव्हरब्रिज आणि पायाभूत सुविधांची  प्रत्यक्ष  स्थळावर  जाऊन शुक्रवारी (ता. २५) पाहणी केली. सुमारे तासभर पाहणी केल्यानंतर त्यांनी साइट ऑफिसमध्ये शेंद्रा आणि बिडकीनच्या कामांचा अडीच तास आढावा घेतला.

बिडकीन आणि शेंद्रा येथे असलेल्या भूसंपादनाच्या अडचणी त्यांनी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सोडवणुकीबाबत मार्गदर्शन केले. किरकोळ विषयांवर हे भूसंपादन अडले असून, त्यांची सोडवणूक वेगाने करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या वेळी सहसरव्यवस्थापक गजानन पाटील, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सोहम वायाळ, विष्णू लोखंडे, महेश शिंदे पाटील, शैलेश धाबेकर, प्रसाद जस्ती आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

‘ऑरिक’ औरंगाबादसाठी गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पाचे ९९ टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. कोणाला विहिरीचा, कोणाला झाडाचा मोबदला मिळाला नसल्यासारख्या किरकोळ अडचणी आहेत. त्यांचा निपटारा आगामी पंधरा दिवसांत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी.

Web Title: bidkin Land Acquisition issue