
Prashant Bamb : गंगापूर कारखान्यात आमदार बंब यांना धक्का
गंगापूर : येथील साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसला. संचालकांच्या वीस पैकी वीस जागा जिंकून कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने विजयी मोहर उमटवली. विशेष म्हणजे लासूर स्टेशन गटातून आमदार बंब यांचाही पराभव झाला.
गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही गटाने मदत केल्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी नगराध्यक्ष संजय जाधव बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांसाठी रविवारी (ता.१२) मतदान झाले होते. सोमवारी (ता.१३) मतमोजणी झाली असता धक्कादायक निकाल हाती आला. २०१५ मध्ये हा कारखाना आमदार बंब यांच्या ताब्यात आला होता. अध्यक्ष म्हणून कारखाना सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला अनेकदा दिले होते. मात्र, कारखाना सुरू न झाल्याने मोठा रोष होता. त्याचाच परिणाम म्हणून निकाल त्यांच्या विरोधात गेल्याचे मानले जात आहे.
साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या कार्यकाळात कारखाना चांगला सुरू होता. दरम्यान, कारखाना सुरू असताना कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. मला कारखान्याबद्दल जिव्हाळा आहे. मीच कारखाना सुरू करू शकतो, अशी भावनिक साद कृष्णा पाटील यांनी मतदारांना घातली होती. आमदार बंब यांनी पुढील दसऱ्याला तर कृष्णा डोणगावकर यांनी याच दसऱ्याला कारखाना सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
विजयी उमेदवार
जामगाव गट : सुरेशचंद्र मनाळ, कचरू शिंदे, प्रवीण वालतुरे
लासूर गट : कृष्णा पाटील डोणगावकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप
गंगापूर गट : बाबूलाल शेख, शेषराव साळुंके, मधुकर साळुंके
शेंदुरवादा गट : प्रल्हाद निरफळ, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले
वाळूज गट : दिलीप बनकर, भाऊसाहेब पाटेकर, तुकाराम कुंजर
महिला प्रतिनिधी : माया दारूंटे, शोभाबाई भोसले
इतर मागासवर्गीय प्रवर्ग : नामदेव दारूंटे
अनुसूचित जाती, अनु. जमाती प्रवर्ग : काशिनाथ गजहंस
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग : देवचंद राजपूत.