एसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

अनिल जमधडे
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या अनेक बसमधील ॲक्‍सिलरेटरला चक्क रबराने बांधून बस पळविल्या जात आहेत. प्रवासादरम्यान अचानक हे रबर तुटले तर मोठा अपघात होऊ शकतो. हा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाला. 

औरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या अनेक बसमधील ॲक्‍सिलरेटरला चक्क रबराने बांधून बस पळविल्या जात आहेत. प्रवासादरम्यान अचानक हे रबर तुटले तर मोठा अपघात होऊ शकतो. हा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाला. 

एसटी महामंडळाची मदार प्रवासी आणि बसगाड्यांवरच आहे; मात्र महामंडळ प्रवासी आणि बसकडे दुर्लक्ष करीत आहे. महामंडळात बसगाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुट्या भागांचा कायम तुटवडा असतो. सध्या औरंगाबाद विभागातील अनेक बसमध्ये ॲक्‍सिलरेटर चक्क रबरने बांधलेले असल्याचे चित्र आहे. चालकाला पायाने ॲक्‍सिलरेटरला ऑपरेट करावे लागते. ॲक्‍सिलरेटरला दिला जाणारा ताण हा बसगाडीला वेग देण्याचे काम करतो. यासाठी ॲक्‍सिलरेटरला ताण देण्यासाठी असलेली छोटी स्प्रिंग अत्यंत महत्त्वाचे काम करते. बसचा वेग कमी करण्यासाठी ताण कमी केल्यानंतर ॲक्‍सिलरेटरला पूर्वस्थितीत आणण्याचे काम ही स्प्रिंग करते; मात्र एकदा का ही स्प्रिंग निघाली किंवा खराब झाली, तर एसटीकडून पुरेशा प्रमाणात ती पुरवली जात नाही. त्यामुळे चालक ॲक्‍सिलरेटरला रबर बसवून बस चालवत आहेत. 

बस लांब फेऱ्यांवर  
अनेक बसच्या ॲक्‍सिलरेटरच्या स्प्रिंग सुस्थितीत नसल्याने चालक बसस्थानकावर रबरचा शोध घेतो. कुठूनतरी टाकून दिलेल्या ट्यूबचे रबर आणून ते ॲक्‍सिलरेटरला बांधतो आणि बसला घेऊन पुणे, मुंबई या लांबच्या फेऱ्यांसह इतर विविध शहरांकडे रवाना होतो. अत्यंत धोकादायक पद्धतीची अशी बसगाडी बिनधास्तपणे रस्त्यावरून धावत आहे. 

महत्त्वाचा घटक
वाहनाचे इंजिन आणि फ्यूल टॅंकमध्ये समन्वय ठेवण्याचे काम ॲक्‍सिलरेटर करते.
जेव्हा चालक पहिल्या गिअरवर वाहन पुढे नेतो तेव्हा सावकाशपणे ॲक्‍सिलरेटर दाबले जाते.

जेव्हा पिक-अप घ्यायचा असतो तेव्हा ॲक्‍सिलरेटरचा वापर करावाच लागतो. 

रबर तुटले तर...
ॲक्‍सिलरेटरला बांधलेले रबर तुटले तर वेगावर परिणाम होतो.
गाडीचा वेग अचानक कमी होऊन पाठीमागील वाहन धडकण्याची भीती
वेग कमी झाल्याने वाहनांच्या गर्दीतून बाजूलाही घेता येणे अवघड होऊ शकते
सुसाट वाहनाबाबत हा प्रकार घडला तर वेग अनियंत्रित होतो.
ॲक्‍सिलरेटरच्या रबर जुगाडाने मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Binding the exceller in the bus