अभयारण्यात पक्षी धोक्‍यात, वन्यजीव विभागाचे महोत्सव जोरात

संकेत कुलकर्णी
रविवार, 20 जानेवारी 2019

पक्षी अभयारण्यातील विपुल पक्षीवैभवाची लोकांना ओळख व्हावी, यासाठी आम्ही हे महोत्सव घेतले. शाळा, महाविद्यालयांत जाऊन असे अधिकाधिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्याला मिळणारा प्रतिसादही समाधानकारक आहे.
- आर. आर. काळे, विभागीय वन अधिकारी.

औरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. वन्यजीव विभाग मात्र पक्षी महोत्सवात आणि हौशी पक्षीमित्रांच्या झुंडींना पक्षी निरीक्षण करवण्यातच मश्‍गूल आहे. लोकशिक्षण हीदेखील एक प्रशासकीय जबाबदारी असली, तरी या गदारोळात मूळ कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तज्ज्ञ करत आहेत.

तब्बल 33 हजार 379 हेक्‍टरवर पसरलेल्या आणि मुबलक पाणपसारा असलेल्या जायकवाडी धरणाच्या जलाशय परिसराला 1986 मध्ये पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. 269पेक्षा अधिक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, 79 प्रकारच्या पाणवनस्पती, 200 प्रकारची शेवाळे, 67 प्रजातींचे लहानमोठे मासे, अशी समृद्ध परिसंस्थाच येथे तयार झाली. लाखोंच्या संख्येने आणि हजारोंच्या थव्याने पक्षी येथे येऊन विसावू लागल्याने जगभरातील पक्षी अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पक्षीवैभवाला दृष्टच लागली आहे. पक्ष्यांचे थवे कमी होत चालले आहेत. फ्लेमिंगोंच्या आकर्षणापोटी येथे छायाचित्रकारांची गर्दी तर होतेच; पण ऐन विणीच्या काळातच पाणलोट क्षेत्रात वन्यजीव विभागाचे शिकारी आणि मच्छिमारांवर नियंत्रण न राहिल्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. त्यातच शहरांतील पक्षी महोत्सवांच्या तयारीत वनरक्षकांना गुंतवून, धरणावरही हौशागवशांच्या झुंडी नेणे सुरू झाल्यामुळे वन्यजीव विभागाची पक्षीगणना आणि राखणीची मूळ कामेच दूर राहत आहेत, अशी तक्रार काही तज्ज्ञांबरोबरच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही खासगीत "सकाळ'कडे केली.

परावलंबी वन्यजीव विभाग इव्हेंट मॅनेजर्सच्या दावणीला
नोव्हेंबर ते मार्च हा पाहुण्या पक्ष्यांचा काळ. या काळात पक्ष्यांना त्यांच्या अधिवासात एकांत देण्याऐवजी झुंडीने तिथे जाणे गैर आहे. वर्षभरात कमी-अधिक पडलेला पाऊस, जलाशयाची वाढलेली वा कमी झालेली पाणीपातळी, हवामानातील बदल, पक्ष्यांची संख्या, किनाऱ्यावरील घडामोडी, पाण्याची गुणवत्ता तपासणी, शेतांतील रासायनिक खतांच्या वापराचे परिणाम, अशा पक्षी अधिवासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे वन्यजीव विभागाचे मुख्य काम आहे. मात्र पक्षीसंवर्धनात रस नसल्यामुळे एनजीओंच्या कार्यक्रमांवर अवलंबून असलेल्या वन्यजीव विभागाला स्पर्धा, महोत्सव, ठराविक फिल्म्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन, प्रशासकीय अधिकाऱ्यांची रटाळ भाषणे, अशा कसरती कराव्या लागत आहेत. एनजीओ आणि काही पक्षीप्रेमींना हाताशी धरून इव्हेंट मॅनेज केले, की आपले काम संपले, ही भावना अधिकाऱ्यांमध्ये वाढीस लागत असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी "सकाळ'कडे व्यक्त केली.

पक्षी अभयारण्यातील विपुल पक्षीवैभवाची लोकांना ओळख व्हावी, यासाठी आम्ही हे महोत्सव घेतले. शाळा, महाविद्यालयांत जाऊन असे अधिकाधिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्याला मिळणारा प्रतिसादही समाधानकारक आहे.
- आर. आर. काळे, विभागीय वन अधिकारी.

परिसंस्थेचे महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचावे, हे या महोत्सवांचे प्रयोजन आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये झालेल्या महोत्सवात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह काही पक्षीतज्ज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.
- आर. एम. सोनटक्के, सहायक वनसंरक्षक, जायकवाडी पक्षी अभयारण्य.

Web Title: bird sanctuary in Aurangabad