निलंग्याच्या स्मशानभूमीत वाढदिवस, भजन आणि योगासनेही

महेश वा़डीकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

स्मशानभूमी म्हणजे अंत्यसंस्काराची जागा. अशा जागेत वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतील तर...?  निसर्गरम्य, विविध सुविधांयुक्त बनविलेल्या येथील आदर्श स्मशानभूमीत असे उपक्रम होतात. त्यामुळेच ही स्मशानभूमी चर्चेत आली आहे. 

निलंगा ः स्मशानभूमी म्हटले म्हणजे कच्चा, खडबडीत रस्ता, चहूबाजूने वाढलेली काटेरी झुडपे, तुटके-फुटके गंजलेले चार पत्रे आणि अंत्यविधी आटोपून परतताना हातातून टाकलेली निंबाच्या झाडाची पाने डोळ्यांसमोर येतात. या बाबींना छेद देत अशोकनगर (ता. निलंगा) येथे निलंग्यातील काही सामाजिक संघटना व निलंगा पालिकेच्या माध्यमातून आदर्श समशानभूमी उभी करण्यात आली. दोन ओटे, चोहोबाजूने पडीक संरक्षक भिंत, काटेरी झुडपाच्या घेऱ्यात पूर्वी ही समशानभूमी होती.

निलंगा तालुक्‍यातील तब्बल बावन्न सामाजिक संघटनांनी समशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. संघटनांचे कार्यकर्ते दररोज पहाटे जाऊन हे काम करायचे. बघता बघता या उजाड समशानभूमीचे चित्र बदलून गेले. परिसरात जवळपास दोन हजार झाडे लावून ती जगवली आहेत. येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था नव्हती. आता 56 डेस्क आहेत. अंत्यविधीसाठी दोन शेड उभारण्यात आले आहेत. या सर्व कामांमुळे दुर्लक्षित असलेला हा परिसर लक्षवेधी ठरला आहे. स्मशानभूमीचे नामकरण "शांतिवन' असे केले आहे.

केवळ सुशोभीकरणच नाही तर या स्माशानभूमीत वेगवेगळे उपक्रमही होत आहेत. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम. एम. जाधव यांचा वाढदिवस आनंदवाडी (ता. निलंगा) येथील स्मशानभूमीत साजरा झाला होता. या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन तेथील स्मशानभूमीत हे उपक्रम सुरू झाले आहेत. 

भजन, वाढदिवस 
या स्मशानभूमीत शहरातील भजनी मंडळे सायंकाळी भजन सादर करत आहेत. काही युवकांनी आपले वाढदिवस येथे साजरे करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक नवा संदेश दिला. पूर्वी स्मशानभूमी जवळून जाताना विरुद्ध दिशेला माना फिरवणारे लोक आता वेळ काढून स्मशानभूमी पाहण्यासाठी येत आहेत. 

मान्यवरांकडून कौतुक 
स्मशानभूमीचे सुशोभीकरण, सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. त्यात माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, अशोकराव पाटील निलंगेकर आदींचा समावेश आहे. त्यांनी वेळोवेळी भेटी देऊन श्रमदानातही सहभाग घेतला आहे. 

अशोकनगरातील स्मशानभूमीची दुरवस्था होती. चहूबाजूने वाढलेली काटेरी झुडपे, मृत जनावरे, कचरा असायचा. हे रूप पालटण्यासाठी सुरवातीला मोजक्‍या लोकांनी कामाला सुरवात केली. नंतर साथ मिळत गेली. पहाटे श्रमदान करीत असत. श्रमदानानंतर तेथेच खिचडी करून खायचो. सुशोभीकरणानंतर या स्मशानभूमीत आता वाढदिवस साजरे होतात. पहाटे योगा, सायंकाळी भजने होतात. लोक जमतात. हे पाहून आंद होतो. 
- कुमोद लोभे, दक्षता समिती सदस्य, निलंगा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday, hymns and yoga in Nilanga Cemetery