श्रीपूरमध्ये साजरा केला झाडांचा वाढदिवस; सकाळचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

श्रीपूरच्या इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडियम स्कूलच्या आवारात गेल्या दोन, तीन वर्षापुर्वी वृक्षारोपन केले होते. या रोपांचे आता मोठ्या झाडांमध्ये रुपांतर झाले आहे.

अकलूज (औरंगाबाद) - 'सकाळ' माध्यम समूह फक्त झाडे लावत नाही तर वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. रोपण केलेल्या आणि वाढलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करुन पर्यावरण वृध्दीसाठी 'सकाळ' देत असलेले योगदान अभिनंदनीय आणि अनुकरणीय असेच आहे. अशी भावना श्रीपूरच्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

हरीत वारी या संकल्पनेतून सकाळने श्रीपूर येथे लावलेल्या रोपांचे आता झाडांमध्ये रुपांतर झाले आहे. श्रीपूरच्या इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडियम स्कूलच्या आवारात गेल्या दोन, तीन वर्षापुर्वी वृक्षारोपन केले होते. या रोपांचे आता मोठ्या झाडांमध्ये रुपांतर झाले आहे. या झाडांमुळे शाळेचे सौंदर्य वाढले आहे. या झाडांच्या शांत, शितल सावलीत मुले आणि शिक्षक विसावताना दिसत आहेत. मुलांच्या सायकली आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांसाठी सावली उपलब्ध झाली आहे. ही झाडे वाढविण्यासाठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व सेवकांनी कष्ट घेतले आहेत. त्यामुळेच या शाळेच्या प्रांगणात हिर्वाई आवतरली आहे. 'सकाळ'ने लावलेल्या या झाडांचा वाढदिवस आज (दि. १६) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पांडुरंगचे कार्यकारी संचालक श्री कुलकर्णी यांच्या हस्ते वडाच्या व प्राचार्य एस. पी. खडतरे यांच्या हस्ते सप्तपर्णीच्या झाडाला पाणी घालून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शिक्षक व सेवकांनी अन्य झाडांना आळी करुन झाडांना पाणी दिले. 'सकाळ'चे तालुका बातमीदार मनोज गायकवाड यांनी 'सकाळ'चे विविध उपक्रम, हरीत वारी उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गावर लावलेली झाडे व त्यांची आजची स्थिती याबाबत माहिती दिली. प्राचार्य खडतरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी एस. के. सुर्यवंशी, डी. टी. कुलकर्णी, पी. एम. हिंगमिरे, सी. एम. जाधव, ए. पी. अभंगराव, डी. व्ही. ननवरे, आर. एन. घाडगे, एस. एल. भोसले उपस्थित होते.

इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडीयमच्या आवारातील 'सकाळ'च्या वृक्षारोपण उपक्रमासाठी श्रीपूरच्या प्रणव प्रतिष्ठानने रोपे उपलब्ध करुन दिली होती. त्यातील वडाचे झाड चांगलेच फोफावले असून या वर्षी वटपौर्णिमेला अनेक महिलांनी या वडाच्या झाडाची पूजा केल्याचे महिला शिक्षकांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Birthday of trees celebrated in Sripur Sakal medias activity