लोहारा गटात उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात चुरस 

युवराज धोतरे 
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

उदगीर - उदगीर नगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळाल्याने पक्षाकडे अनेक उमेदवार उमेदवारी मागत आहेत. यात लोहारा (ता. उदगीर) हा ओबीसी जिल्हा परिषद गट भाजपला डोकेदुखी ठरला असून येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे विद्यमान गटनेते व पक्षाचे स्टार प्रचारक रामचंद्र तिरुके यांना उमेदवारी द्यायची की भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांचे पुत्र राहुल केंद्रे यांना उमेदवारी द्यायची, हा प्रश्न पक्षासमोर आहे. 

उदगीर - उदगीर नगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळाल्याने पक्षाकडे अनेक उमेदवार उमेदवारी मागत आहेत. यात लोहारा (ता. उदगीर) हा ओबीसी जिल्हा परिषद गट भाजपला डोकेदुखी ठरला असून येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे विद्यमान गटनेते व पक्षाचे स्टार प्रचारक रामचंद्र तिरुके यांना उमेदवारी द्यायची की भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांचे पुत्र राहुल केंद्रे यांना उमेदवारी द्यायची, हा प्रश्न पक्षासमोर आहे. 

उदगीर तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली असून अनेक इच्छुक उमेदवार हे पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी लॉंबिंग सुरु केले आहे. 

ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या लोहारा गटासाठी जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. तिरुके व माजी आमदार पुत्र श्री. केंद्रे या दोघांनी उमेदवारीची मागणी केली आहे. दोघांपैकी उमेदवारी ही द्यायची कोणाला असा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला आहे. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता हा निकष लावावा अशी चर्चा आहे. भाजप गटनेते श्री. तिरुके यांचे सताळा हे गाव देवर्जन गटात येते. गेल्या वेळी तोंडार हा जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी भाजपने तोंडार येथून त्यांना उमेदवारी दिली होती. ते विजयीही झाले होते. यावेळी लोहारा गट ओबीसीसाठी आरक्षित झाला. माजी आमदार पुत्र राहुल केंद्रे यांचे कुमठा हे गाव या लोहारा मतदारसंघात आहे. त्यामुळे होम मतदारसंघ म्हणून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या दोघांच्या उमेदवारीमुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. तर उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे मतदारांसह सर्वांचे लक्ष आहे. 

श्री. तिरुके यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. शिवाय त्यांनी उदगीर तालुक्‍यातील जवळपास पाच हजार हृदयरोग व कॅन्सरपिडीत रुग्णांची मुंबई येथे विनाशुल्क शस्त्रक्रिया केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम हे मतदारांत चर्चेचा विषय ठरले आहे. शिवाय पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आमदार सुधाकर भालेराव यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख असून भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे हे त्यांचे राजकीय गुरू आहेत. लोहारा मतदारसंघातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी श्री. तिरुके यांची शिफारस केल्याचीही चर्चा आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते गोविंद केंद्रे हे माजी आमदार आहेत. त्यांचे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुडे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांचे पुत्र राहुल केंद्रे हे भाजयुमोचे प्रदेश चिटणीस आहेत. शिवाय उदगीर नगरपालिकेत एक टर्म नगरसेवक व विषय समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. लोहारा मतदारसंघात त्यांचे गाव असल्याने त्यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. 

स्थानिक मतदारसंघाचा व भाजपात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निर्माण झालेल्या गटबाजीचा परिणाम श्री. तिरुके यांच्या उमेदवारीवर होऊ शकतो. लोहारा गटातूनच कुमठा येथील सुनील केंद्रे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. सुनील हे राहुल यांचे चुलते आहेत. त्यामुळे गावातच मतविभागणीची शक्‍यता आहे. शिवाय उदगीर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार श्री. केंद्रे यांनी सक्रिय काम केले नाही असे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे राहुल यांना उमेदवारी मिळवण्यासाठी या गोष्टी अडचणीच्या ठरणाऱ्या असल्याच्या चर्चा आहेत. 

आमदार व जिल्हाध्यक्षांची कसरत 
लोहारा जिल्हा परिषद गटात दोघा दिग्गजांमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव व जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांना कसरत करावी लागणार आहे. लोहारा जिल्हा परिषद गटात निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारास उमेदवारी देऊन हा गट सर करण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Web Title: BJP candidate for the competition to get the group Lohara