भाजप, कॉंग्रेससोबतच्या युतीसंदर्भात बोलणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

उस्मानाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेनेची कॉंग्रेस व भाजपच्या युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत शिवसेना-कॉंग्रेसची युती असल्याने कॉंग्रेससोबत युती करण्यास प्राधान्य राहील; मात्र युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजीराव सांवत यांनी मंगळवारी (ता. 24) दिली. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्रा. सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, उपनगराध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, माजी शहराध्यक्ष प्रवीण कोकाटे यांची उपस्थिती होती. 

आमदार प्रा. सावंत म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेस व शिवसेनेची युती होती. या कालावधीत कॉंग्रेसने मान-सन्मान दिला. त्यामुळे कॉंग्रेसशी युती करण्यासंदर्भात प्राधान्य राहणार आहे. सध्या युतीबाबत दोन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. येत्या आठवडाभरात या संदर्भातचे चित्र स्पष्ट होईल. युती नाही झाली तर शिवसेना स्बवळावर निवडणूक लढविणार आहे. 

दरम्यान, पालकमंत्री दिवाकर रावते हे जिल्हा दौऱ्यावर आल्याची माहिती जिल्हाप्रमुखाने दिली नव्हती. त्यामुळे आपण त्यांच्या दौऱ्यास उपस्थित नव्हतो. श्री. रावते हे पक्षाचे वरिष्ठ नेते असून, जिल्ह्यात शिवसेना अभेद्य आहे. सध्या तालुका व गटनिहाय मेळावे घेण्यात येत असून, या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रा. सावंत यांनी सांगितले. 

बाळासाहेब ठाकरे शहर परिवहन योजना 
उस्मानाबाद पालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती आल्यास शहर परिवहन योजना सुरू करण्याचे वचन जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्तता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी उस्मानाबाद शहरात बाळासाहेब ठाकरे शहर परिवहन योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करण्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व शिवसेनेच्या नगरसेवकांना सांगितले आहे. येत्या दोन महिन्यांत ही योजना शहरात सुरू करण्यात येणार आहे, असे आमदार प्रा. सावंत यांनी सांगितले.

Web Title: BJP, Congress talks with the Alliance