एमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

समांतर जलवाहिनीबाबतच्या निर्णयासाठी सतरा ऑगस्टला महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला.

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.17) बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात भाजपचे उपमहापौर विजय औताडे व अन्य चार नगरसेवकांना सिटीचौक पोलिसांनी सोमवारी (ता. 20) अटक केली. 

समांतर जलवाहिनीबाबतच्या निर्णयासाठी सतरा ऑगस्टला महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला. त्यानंतर वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित अर्ध्या तासाची चित्रफीत दाखवली गेली. श्रद्धांजलीनंतर नगरसेवक वाजपेयी यांच्याबद्दल भाव व्यक्त करताना सय्यद मतीन यांनी श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर महापौरांसह भाजप नगरसेवक संतप्त झाले. दरम्यान भाजपचे उपमहापौर विजय औताडे, भाजप गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे यांनी नगरसेवक मतीन यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

तसेच अॅड. माधूरी अदवंत यांनी त्यांना चपलेने चोप दिला होता. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान मतीन यांना 18 ऑगस्टला अटक झाली होती. मतीन यांच्या तक्रारीनूसार, सिटीचौक पोलिस ठाण्यात उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे, माधूरी अदवंत यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर भाजपचे उपमहापौर औताडे यांना मयुरपार्क भागातील संपर्क कार्यालयातून सिटीचौक पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर उर्वरित संशयित नगरसेवकांना अटक झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली. 

Web Title: BJP corporator arrested for fighting with MIMs Mattin