भाजपला शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो प्रिय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नागपूर - भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना भरमसाट आश्‍वासने दिली. आता त्यांची फसवणूक केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो रेल्वे व स्मार्ट सिटी जास्त प्रिय आहे, असा आरोप विरोधकांनी केला. सरकारला चले जाव म्हणण्याची हीच वेळ आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकार उलथवून टाकू, असा इशाराही देण्यात आला. 

नागपूर - भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना भरमसाट आश्‍वासने दिली. आता त्यांची फसवणूक केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो रेल्वे व स्मार्ट सिटी जास्त प्रिय आहे, असा आरोप विरोधकांनी केला. सरकारला चले जाव म्हणण्याची हीच वेळ आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकार उलथवून टाकू, असा इशाराही देण्यात आला. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांतर्फे शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी चांदा ते बांधा संघर्ष यात्रेला बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. यवतमाळ जिल्ह्यातून ती गुरुवारी नागपुरात दाखल झाली. व्हेरायटी चौकात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. यात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, जितेंद्र आव्हाड, आमदर सुनील केदार, गोपालदास अग्रवाल, प्रकाश गजभिये उपस्थित होते. 

जोपर्यंत सरकार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करीत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. सभागृहात कर्जमाफीची मागणी करणे गुन्हा असेल तर तो आम्ही हजारवेळा करू. जनतेच्या प्रश्‍नांसाठी निलंबनाची पर्वा नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे अनिल देशमुख व राजेंद्र मुळक म्हणाले. यानंतर संघर्ष यात्रा कोंढाळीकडे रवाना झाली. 

मुख्यमंत्री एसटीतून फिरले का? 
संघर्ष यात्रेत आम्ही एसीबसमध्ये दौरा करीत असल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांमार्फत केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दुष्काळी भागाचा दौरा एसटीच्या टपावर बसून केला का, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. 

अर्धे नेते गाडीत 
संघर्ष यात्रा व्हेरायटी चौकात पोहोचली. काही प्रमुख नेते वाहनातून खाली उतरले व व्यासपीठावर बसले. मात्र, काही नेत्यांनी एसी गाडीतच बसून राहिले. कार्यकर्त्यांना भेटण्याचेसुद्धा त्यांनी सौजन्य दाखविले नाही. 

Web Title: BJP to farmers than the beloved Metro