लातूर लोकसभेसाठी भाजप लागले कामाला; तीन लाख मताधिक्याने जागा जिंकण्याचा संकल्प

हरी तुगावकर
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 5) येथे
पक्षाची बैठक झाली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर अध्यक्षस्थानी
होते.

लातूर : केंद्र व राज्य सरकारने लोकहितांच्या विविध योजना
सक्षमपणे राबविलेल्या आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास
झालेला असून या विकासाच्या मुद्दावर आगामी लातूर लोकसभा निवडणूक 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने जिंकण्याचा ठराव पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांडला. या ठरावाला उपस्थित पक्ष व स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांनी टाळ्या वाजवून दाद देत लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 5) येथे
पक्षाची बैठक झाली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर अध्यक्षस्थानी
होते. या बैठकीस खासदार डॉ. सुनील गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप देशमुख, रमेश कराड, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकहिताला
प्राधान्य देत भ्रष्टाचारास आळा घालण्याचे काम केलेले आहे. सबका साथ सबका विकास या भूमीकेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. त्याच बरोबर देश व देशांर्तगत सुरक्षेला प्राधान्य दिल्याने जागतीक स्तरावर भारताला आपला दबदबा निर्माण करता आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अनेक विकास कामे करून विरोधकांना चोख उत्तर दिलेले असल्याने पक्षासोबत जनता आजही असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती पदाधिकार्‍यांसह
कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना पक्ष प्रवाहात आणण्याचे काम
आगामी काळात करणे अपेक्षीत आहे. देशहितासाठी लोकसभा निवडणूका जिंकणे गरजेचे आहे. या करीता पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनीपक्षाने दिलेला २३ कलमी कार्यक्रम राबवावा. जनता आपल्या सोबत असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे असे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील तसेच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची लातूर, नांदेड व उस्मानाबाद लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे तर आभार शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मानले.

Web Title: The BJP has started planning for Lok Sabha in Latur