शिवसेनेच्या बीड मतदारसंघासाठीही भाजपच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

बीड येथे भाजपच्या मुलाखतीदरम्यान ज्येष्ठ कार्यकर्त्याला मारहाण झाली. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.

बीड - आगामी विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये शुक्रवारी (ता. सहा) युतीत शिवसेनेकडे असलेल्या बीड मतदारसंघासाठीही मुलाखती घेतल्या. सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची भाऊगर्दी दिसली असली तरी परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व गेवराईत लक्ष्मण पवार यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे आले नाही. मुलाखतीदरम्यान भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केल्याचाही प्रकार घडला. आष्टीतून दोन आमदारांसह नातेवाईकही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. 

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे विधानसभा निवडणूक निरीक्षक बबनराव लोणीकर आणि प्रभारी गोविंद केंद्रे यांनी मुलाखती घेतल्या. परळीतून पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधीने त्यांचा बायोडाटा दिला. तर, गेवराईतून केवळ आमदार लक्ष्मण पवार यांनीच मुलाखत दिली. उर्वरित मतदारसंघातून मात्र उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती. माजलगाव मतदारसंघातून आमदार आर. टी. देशमुख यांच्यासह अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, ओमप्रकाश शेटे, मोहन जगताप, केशव आंधळे, स्वरूपसिंह हजारी, नितीन नाईकनवरे आदी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. युतीत शिवसेनेकडे असलेल्या बीड मतदारसंघासाठीही इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यामध्ये राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, नवनाथ शिराळे, अशोक लोढा, स्वप्नील गलधर आदींनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. केजमधून आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह डॉ. अंजली घाडगे, सविता मस्के, आर्या साबळे व बाळासाहेब मस्के यांनी मुलाखत दिली आहे. 

आष्टीतून दोन आमदार इच्छुक 
आष्टी मतदारसंघातून आमदार भीमराव धोंडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस, त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनीही उमेदवारी मागितली आहे. यासह सविता गोल्हार, विजय गोल्हार तसेच साहेबराव दरेकर, अमोल तरटे आदींची मुलाखत घेतलेल्यांच्या यादीत नावे आहेत. 

खासदार साबळेंची कन्याही केजमधून इच्छुक 
केज मतदारसंघातून खासदार अमर साबळे यांच्या कन्या आर्या साबळे यांनीही मुलाखत दिली आहे. अमर साबळे यांच्या त्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले साबळे त्यांच्या दोन्ही निवडणुकांत बीडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे साबळेंच्या कन्येने केजमधून उमेदवारी मागितल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ज्येष्ठाला मारहाण 
मुलाखती सुरू असतानाच बाहेर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली. त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP interviews for Shiv Sena's Beed constituency