Vidhan sabha 2019 : भाजपतर्फे औरंगाबादमधील तिन्ही मतदारसंघांतून तयारी

प्रकाश बनकर
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मध्य आणि पश्‍चिमसाठी कार्यकर्ते आग्रही 

विधानसभा 2019 : औरंगाबाद - विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युतीची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. असे असले तरी शहरातील मध्य आणि पश्‍चिम मतदारसंघांत भाजपतर्फे तयारी करण्यात येत आहे. हे दोन्ही मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहेत. शुक्रवारी (ता. 20) मध्य मतदारसंघासाठीचा भाजपतर्फे बूथप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर पूर्व आणि येत्या दोन दिवसांत पश्‍चिमचाही मेळावा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. 

केंद्रात बहुमत मिळाल्याने शहरातही भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. यामुळे आधी मध्य मतदारसंघ आणि त्यानंतर पश्‍चिम मतदारसंघ भाजपला सोडण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. पूर्व मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे येथे विद्यमान आमदार अतुल सावेंची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मध्यच्या मेळाव्यात पक्षाचे संघटक, प्रवक्‍ते, प्रदेश उपाध्यक्षांनी मध्य मतदारसंघ सोडण्याची मागणी आपल्या भाषणात केली. शिवसेनेचा उमेदवार मध्य मतदारसंघातून निवडून येत नसल्याने ही जागा भाजपला सोडण्याची आग्रही मागणी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार या मतदारसंघातून भाजपतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदारसंघ मिळवणे सोपे नसल्यानेच गेल्या दोन
वर्षांपासून तयारी केली जात आहे. युती झाल्यास कोणत्याही परिस्थितीत ही जागा मिळवण्याची तयारी केली जात आहे. या मतदारसंघातून शहराध्यक्ष किशनंचद तनवाणी, भाजपचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये आणि म्हाडाचे विभागीय सभापती संजय केणेकर इच्छुक आहेत. या तिघांनी गेल्या महिन्यात या मतदारसंघासाठी मुलाखतीही दिल्या होत्या.
आता तिघांतर्फे स्वतंत्रपणे मतदारसंघात तयारी केली जात आहे. 

मध्य मतदारसंघावर एक नजर 
 

मतदार 3 लाख 24 हजार 662 
पुरुष 1 लाख 67 हजार 226 
महिला 1 लाख 57 हजार 436 
मतदान केंद्र 324 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP preparing for Aurangabad